३६0 दिवसात ५४५ चो-या
By admin | Published: December 25, 2014 01:48 AM2014-12-25T01:48:10+5:302014-12-25T01:48:10+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार; पोलिसांपुढे आव्हान, चोरीच्या घटनांचा आलेख वाढला.
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ वाढतच आहे. शहरांसह ग्रामीण भागातही क्षुल्लक चोर्यांसह घरफोडीसारख्या घटनांमध्ये सराईत असलेल्या चोरट्यांचा मोर्चा आता प्राचीन व ऐतिहासिक वस्तुंकडे वळला आहे.
चोरीच्या अशा घटनांचा आलेख दिवसेंदिवस उंचावत असून, २0१४ हे वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून, ३६0 दिवसात तब्बल ५४५ चोरीच्या घटना जिल्ह्यात उघड झाल्या आहेत. अशा घटना रोखणे मात्र पोलिसांपुढेही आव्हान ठरू लागल्या आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातून वाढलेली बेरोजगारी व दैनंदिन गरजा पूर्ण पूर्तीसाठी गुन्हेगार चोरीच्या नव-नव्या क्लृप्त्यांचा शोध लावत आहे. त्यामुळे जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी पोलिसात दाखल होणार्या चोरी, घरफोडी, लूटमार व इतर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या चोर्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना फारसे यश आलेले नाही. एखाद दोन घटनांचा तपास वेगात लागतो. इतर प्रकरणांचा तपास रेंगाळत राहतो, असाच अनुभव आतापर्यंत आहे. त्यामुळे पोलिसांसमोरचे आव्हान वाढले असून, सिंदखेडराजामधील तोफ चोरीच्या प्रकरणाचा छडा लावणे पोलिसांसाठी आव्हानाचेच नाही तर प्रतिष्ठेचेही झाले आहे.
सिंदखेडराजा येथे १६ व्या शतकाच्या अनेक वास्तु येथे उभ्या आहेत, या वास्तुमधील अनेक ऐतिहासिक वास्तु याआधी गायब झाल्या आहेत. येथील दिगंबर जैन मंदिरातून २४ तीर्थंकरांची पंचधातूची मूर्ती १३ ऑक्टोबर २0१३ रोजी चोरीला गेली होती. या घटनेला १४ महिने पूर्ण झाले. २२ डिसेंबरच्या रात्री राजवाड्यातून ८५ किलो वजनाची पंचधातूची तोफ चोरीला गेली. १0 वर्षांपूर्वी साखरखेर्डा येथील श्रीराम मंदिरातून श्रीराम, लक्ष्मण, सीतामायीची पंचधातूची मूर्ती चोरीला गेली होती. मंदिर, राजवाडा यामधून ज्याकाही मूर्ती, दागिणे, तोफा चोरी गेल्यात त्याचा कोठेच शोध लागत नाही.
गेल्या दहा वर्षातल्या चोरी आणि घरफोडीच्या ३ हजार ५४५ गुन्ह्यांपैकी अवघ्या २ हजार ४६ गुन्ह्यांचा गुंता पोलिसांनी सोडविला आहे, तर १५ दरोड्यांपैकी ९ गुन्ह्यांतील दरोडेखोरांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्यामराव दिघावकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आलेल्या प्रत्येकी तक्रार नोंदवून घेणे हे कर्तव्यच असल्याने चोरींच्या प्रकरणांचा आकडा वाढता दिसत असल्याचे सबब पुढे केली. मोठया घटनांमध्ये पोलीसांनी तातडीने छडा लावला असुन अनेक दाखले देता येतील. सिंदखेडराजा प्रकरणात तपास योग्य दिशेने सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.