कोविड रुग्णालयात दातृत्वातून उभारली जातेय ५५ खाटांची गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:46 AM2021-04-13T11:46:56+5:302021-04-13T11:47:13+5:30
Covid Hospital Khamgaon : आता दातृत्वातूनच आणखी ५५ खाटांची गुढी रूग्णालयात उभारल्या जात आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणखी ४० बेड वाढविण्यात येत आहेत. कोरोना संकटावर मात करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच १५ खाटा वाढविण्यात आल्या. आता दातृत्वातूनच आणखी ५५ खाटांची गुढी रूग्णालयात उभारल्या जात आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील रूग्णांसह परिसरातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबविण्यास मदत मिळणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच संकट अधिक गडद होत आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या अनुषंगाने कोविड सेंटर आणि बेडस् वाढविण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने गत आठवड्यात ४ कोविड सेंटरची वाढ केली आहे. अशातच खामगाव येथील ५० (खाटा) असलेल्या कोविड रूग्णालयात आणखी ४० खाटा वाढविण्यात येत आहेत. यामध्ये गत महिन्यातच १५ खाटा अतिरिक्त वाढविण्यात आल्या होत्या. आतापर्यंत तब्बल ५५ खाटा वाढविण्यात येत आल्याने खामगाव येथील कोविड रूग्णालयांची क्षमता १०५ खाटांवर पोहोचली आहे. परिणामी, घाटाखाली रूग्णांना खामगावातच उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोविड रूग्णालयाची क्षमता १०५ खाटांवर पोहोचणार!
कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड रूग्णालयाच्या उभारणी, कोविड टेस्टींग लॅब निर्मिती आणि रूग्णालयाच्या ऑडीटसाठी तब्बल ५० लक्ष रुपयांची मदत खामगाव येथील एका दानशुराने केली. आता कोरोना उद्रेकाचा प्रकोप वाढता असतानाच, खामगाव कोविड रूग्णालयातील खाटा वाढविण्यासाठी याच दानशुराने आणखी मदतीचा हात पुढे केला आहे.