५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:08+5:302021-06-21T04:23:08+5:30

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा ...

55 thousand 108 students will pass without taking the exam | ५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

५५ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा न देताच हाेणार उत्तीर्ण

Next

जानेफळ : शासनाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विना परीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांनी परीक्षा न देताच पुढच्या वर्गात उडी घेतली आहे. मात्र, अभ्यासासाठी दिवस-रात्र एक केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुक्यातील ५५ हजार १०८ विद्यार्थी पुढच्या वर्गात जाणार आहेत.

मागील वर्षभरापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद आहेत. मुलांना अभ्यासाची सवय राहिली नसल्याने व यंदादेखील प्रत्यक्ष जून महिन्यातसुद्धा शाळा सुरू होण्याचा मुहूर्त हुकणार असल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.

कोरोनामुळे सर्वांत जास्त झळ शिक्षण क्षेत्राला बसली असून, गत १५ महिन्यांपासून प्राथमिक शिक्षण प्रत्यक्ष बंदच आहे. यामुळे मुलांचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे. तालुक्यातील एकूण १५ केंद्रांतर्गत प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मिळून एकूण २५१ शाळांपैकी ८९ खाजगी, १५१ जिल्हा परिषद शाळा, तर ११ नगर परिषद शाळांचा समावेश आहे.

शिक्षण विभागाने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये खाजगी शाळेतील ३८ हजार ६७२, जिल्‍हा परिषद शाळांमधील १४ हजार ९५६, तसेच नगर परिषद शाळेतील १४८० विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार आहेत. यात दहावीच्या ५०२८, तर बारावीच्या २७७५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा रद्दच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे़ मात्र, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कष्टाचे योग्य फळ मिळणार नसल्याने ते नाराज आहेत.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यात विद्यार्थी परीक्षा न देताच उत्तीर्ण होणार असल्याने ते अभ्यास करणार नाहीत. रुग्ण कमी झाल्यावर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

राम शिंदे (पालक)

पालकांची चिंता वाढली

शाळा सलग बंद असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाची सवय राहिली नसून अभ्यासाची गोडीसुद्धा कमी झाल्याने पालकांच्याही चिंतेत मोठी भर पडली आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुलांच्या हातात मोबाइल आल्याने गेम खेळणे व इतर प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे उशिरा का होईना सरकारने परीक्षा घ्यायला हवी होती. जेणेकरून परीक्षेच्या भीतीने विद्यार्थ्यांनी अभ्यास केला असता असे मत पालकांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: 55 thousand 108 students will pass without taking the exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.