तीन दिवसात ५६३ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:43 AM2021-04-30T04:43:24+5:302021-04-30T04:43:24+5:30
निर्बंध वाढल्याने व्यापारी नाराज बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधामध्ये पुन्हा १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १५ मे ...
निर्बंध वाढल्याने व्यापारी नाराज
बुलडाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधामध्ये पुन्हा १५ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. १५ मे पर्यंत आता निर्बंध वाढविण्यात आल्याने व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांचे अर्थचक्र पूर्णतः बिघडले आहे.
रस्ता कामाचा प्रश्न लागणार मार्गी
जानेफळ : मेहकर तालुक्यातील जानेफळ परिसरात अनेक रस्त्यांचे काम रखडलेले आहे. दरम्यान जानेफळ, लोणी गवळी, शेलगाव देशमुख, पांगरखेड, बेलगाव ते केनवड पर्यंतच्या २३ कि.मी. रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक दिवसानंतर या रस्ता कामाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. डोणगाव ते लाेणी गवळी या रस्त्यावरील खड्डे अपघातास आमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्त्याची दुरूस्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे. जानेफळ ते लोणी गवळी रस्त्याचीही पुन्हा दुरवस्था निर्माण होत आहे.
दिव्यांगांची फरपट
बुलडाणा : जिल्ह्यात जवळपास ६५ हजारांवर दिव्यांगांची नोंदणी झालेली आहे. नोंदणी न झालेल्यांची संख्याही मोठी आहे. परंतु आता लॉकडाऊनमुळे दिव्यांगांचे रोजगार गेल्याने त्यांची फरपट होत आहे. अनेकांवर आर्थिक संकट आले आहे.
बालविवाहांचे प्रमाण वाढले
बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. मागील तीन ते चार दिवसांमध्ये तीन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. बालविवाहाचे प्रकार वारंवार समोर येत असल्याने पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे.
संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन
दुसरबीड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी गावाबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे.
क्वारंटाईन असताना बाहेर पडल्यास गुन्हा
बुलडाणा : बाधितांच्या संपर्कात येणारे, किंवा स्वत: पॉझिटिव्ह असलेले अनेक रुग्ण सध्या होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. हातावर असा शिक्का मारल्या जात नसल्याने असे रुग्ण बाहेर पडतात. त्यामुळे कोरोना रुग्णाने बाहेर पडू नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. बाहेर पडल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे.
चारा टंचाईची समस्या
किनगाव राजा : यंदा पावसाने चाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. सिंदखेड राजा तालुक्यात चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कडब्याचे भाव वाढले आहेत. वाळलेला चारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पशुपालक अडचणीत आहेत.
लोणार, मेहकर मार्गाने रेतीची चोरटी वाहतूक
सुलतानपूर: लोणार ते मेहकर या मार्गाने रेतीची अवैध वाहतूक सुरु आहे. अंधाराचा फायदा घेत रात्री १० वाजेपासून ते सकाळी ६ वाजेपर्यंत टिप्परची भरधाव वाहतूक सुरु असते. त्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळणी झाली आहे. परिणामी अपघाताच्या घटना वाढत आहेत.
‘स्टडी फ्रॉम होम’ला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
हिवरा आश्रम : ‘कोरोना’च्या पृष्ठभूमीवर लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे शाळा बंद असून परीक्षा रद्द झाल्या आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये, परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेने ‘स्टडी फ्रॉम होम’ हा उपक्रम सुरू केलेला आहे. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जंतुनाशक फवारणीची गरज
धामणगाव बढे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दुबार जंतुनाशक फवारणी करण्याची गरज आहे. कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतने फवारणी करण्याची आवश्यकता आहे. गावातील सर्वच भागात ही फवारणी व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.