झोपडीतील व्यक्तीला ५७ हजारांचे वीज बिल!
By admin | Published: April 15, 2016 02:00 AM2016-04-15T02:00:58+5:302016-04-15T02:00:58+5:30
महावितरणचा महाप्रताप पुन्हा चव्हाट्यावर.
शिखरचंद बागरेचा/वाशिम
जिल्हय़ातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिलाची आकारणी करुन विद्युत ग्राहकांकडून पठाणी वसुली करणार्या विद्युत महावितरणचा महाप्रताप चव्हाट्यावर आला आहे. झोपडीत राहणार्या एका व्यक्तीला महाविरतणच्यावतीने मार्च महिन्याचे बिल ५७ हजार रूपये देण्यात आले आहे.
दारिद्रय़रेषेखालील असलेल्या व झोपडपट्टीतील रहिवासी असलेल्या कुटुंबास दीड लाखांचे विद्युत बिल देण्यात आले आहे. त्यानंतर अव्वाच्या सव्वा बिल देण्याचा हा दुसरा प्रकार घडला आहे. जनार्दन गायकवाड यांच्या घराशेजारी असलेल्या गिरजा सुभाष रणशिंगे या विधवा महिलेच्या झोपडीचे १७ हजार १९0 रुपयाचे देयक आपणास देण्यात आल्याची माहिती अन्यायग्रस्त गिरजा रणशिंगे यांनी दिली. तर शहरातील जुम्मा मशिदीजवळ राहणार्या अतिक मोहम्मद शरीफ यांना महावितरणकडून मार्च २0१६ चे तब्बल ५७ हजार ९२४ रुपयांचे देयक प्राप्त झाले असल्याचे शरीफ यांनी सांगितले.
अतिक शरीफ यांनी माहे फेब्रुवारी २0१६ च्या १३ तारखेला ९५0 रुपये विज बिलाची रक्कम भरली असल्याची माहिती देत, मोलमजुरी करुन कुटुंबाचे पालनपोषण करताना अनेक संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले.