५७0 संस्थांचा कारभार ८१ सचिवांवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2016 02:32 AM2016-02-06T02:32:31+5:302016-02-06T02:32:31+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्यांची बकाल अवस्था झाली असून सहा महिन्यांपासून सचिवांचे पगार रखडले आहे.
बुलडाणा : कधीकाळी शेतकर्यांच्या हिताच्या असलेल्या गावपातळीवरील सेवा सहकारी सोसायट्यांची बकाल अवस्था झाली असून, जिल्हाभरातील ५७0 सोसायट्यांचा कारभार ह्यरामभरोसेह्ण असल्याचे चित्र आहे. अनेक सोसायट्यांचा कारभार एका सचिवाला सांभाळावा लागत असल्याने, याशिवाय वसुली नसल्याने या गावपातळीवरील गोरगरीब शेतकर्यांना पेरणीच्या वेळी कर्जरूपात अर्थपुरवठा करणार्या सोसायट्या बकाल झाल्या आहेत. ५७0 पैकी ४५६ संस्था तोट्यात आहेत.
जिल्हाभरात जवळपास ५७0 विविध कार्यकारी सेवा सोसायट्या कार्यरत असून, यातील एक संस्था अवसायनात गेली आहे. उर्वरित संस्था बर्यापैकी असल्या तरी कर्जवाटप केल्यावर वसुलीच नसल्याने संपूर्ण व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यातच पटावर गटसचिवांची संख्या ३२५ असली तरी प्रत्यक्षात ८१ गटसचिव काम करीत असल्याने त्यांच्यावर कामाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे या संस्था ऑक्सिजनवर सुरू आहेत. केवळ राजकीय रंगबंध व गुलाल उधळण्यापुरत्या नाममात्र या संस्था राहिल्या आहेत. त्याचा विकास कामावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.