बुलडाणा जिल्ह्यातील ५८ रुग्णांची म्युकरमायकोसिसवर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 10:57 AM2021-07-12T10:57:13+5:302021-07-12T10:57:31+5:30
58 patients from Buldana district overcome mucormycosis : म्युकरमायकोसिस आजारावर जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ जणांनी मात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान तरुणांच्या मृत्यूमुळे निर्माण झालेल्या धास्तीतच जनसामान्यांमध्ये अनामीक भीती निर्माण म्युकरमायकोसिस आजारावर जिल्ह्यातील ६३ पैकी ५८ जणांनी मात केली आहे. दरम्यान पाच जणांचा यामुळे मृत्यू झाला असला तरी जिल्ह्यातील तब्बल ९२ टक्के रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या उपचाराधीन असलेला एकही म्युकरमायाकोसिसचा रुग्ण नाही. त्यामुळे जिल्ह्यातून हा आजार आता परतीच्या मार्गावर असल्याची चिन्हे आहेत.दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात तब्बल ४१३ व्यक्तींचा बळी घेतांनाच ६१ हजार ११० जणांना संक्रमीत केले होते. दुसरी लाट मे महिन्यात परमोच्चबिंदूवर खाली घसरण करत अतानाच म्युकरमायकोसिस आजाराने जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्यातच या आजावर असणारी महागडी अैाषधे तथा एका रुग्णास तब्बल २० ते ४० डोस द्यावे लागत असल्याने जिल्ह्यात निर्माण झालेला अैाषधांचा तुटवडा पाहता तब्बल ६३ रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कोरोना पाठोपाठ हा काय नवीन आजार? असे म्हणत अनेकांनी त्याची धास्ती घेतली होती. विशेष म्हणजे मे महिन्याच्या मध्यापर्यंत बुलडाणा शहरातील एकाही मेडीकल दुकानावर या आजारासंदर्भातील अैाषधी उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे मोठा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे थेट नागपूर येथील डेपोकडे अैाषधांची मागणी करण्यात आली होती. परिणामी जिल्ह्यातील म्युकरमायकोसीसचे रुग्ण हे नागपूर व अैारंगाबाद येथे उपचारासाठी पाठवावे लागत होते. त्यानंतर पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी निर्देश दिल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांसाठी विशेष कक्ष उघडण्यात आला होता.
या रुग्णांना होता धोका
मधुमेह, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले, ल्युकेमिया, दीर्घकाळ स्टेरॉईडचा वापर करणारे आणि योग्य पोषण आहार न मिळालेल्यांना हा बुरशीजन्य आजार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. सोबतच बुरशीजन्य आजारामुळे नाक, डोळा, दात व जबड्याला या आजारामुळे त्रास होता. सोबतच नाकातील पोकळ हाडावाटे ही बुरशी शरीरात प्रवेश करते. त्यामुळे डोके दुखणे, डोळ्यावर सूज येणे, नाकात दाह होणे, दात दुखणे अशा प्रकारची या आजाराची लक्षणे होती.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात घट झाली आहे. वर्तमान स्थितीत यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष कक्षात एकही रुग्ण नाही. असे असले तरी नागरिकांनी आरोग्य विषयक काळजी घेण्याची गरज आहे.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा)