५९३ इच्छुक ग्रामपंचायत निवडणूक लढवण्यास अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:29 AM2020-12-24T04:29:51+5:302020-12-24T04:29:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च आयोगाने दिलेल्या मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा खर्च आयोगाने दिलेल्या मुदतीच्या आत सादर न केल्यामुळे जिल्ह्यातील ५९३ इच्छुकांना यंदाची ग्रामपंचायत निवडणूक लढता येणार नाही.
गेल्या वेळचा निवडणूक खर्च सादर न केल्यामुळे १२ मे २०१६ रोजी या उमेदवारांना तत्कालीन जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले होते. त्यामुळे सध्या होत असलेल्या जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत या उमेदवारांना रिंगणात उतरता येणार नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.
ग्रामीण भागातील अनेक जणांना या नियमाची माहितीच नसल्याने त्यांना गेल्यावेळी या निर्णयाचा फटका बसला होता.
वास्तविक निवडणूक आयोगाने ६ मे २०१० रोजीच अनुषंगिक एका पत्रकान्वये यासंदर्भात सूचित केलेले आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत ५९३ जण निवडणूक लढवू शकत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे गेल्यावेळी एकट्या खामगाव तालुक्यातील १०० तर संग्रामपूरमधील ११८ उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्चच सादर केला नव्हता. त्यामुळे यंदाची ग्रामपंचायत निवडणूक व पोटनिवडणूक लढविण्यास ते अपात्र ठरले आहेत.
सदस्यसंख्येनुसार खर्च
७ ते ९ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या उमेदवाराला २५ हजार रुपये निवडणूक खर्च मर्यादा आहे. ११ ते १३ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या उमेदवाराला ३५ हजार रुपये तर १५ ते १७ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ५० हजार रुपयापर्यंत निवडणुकीचा खर्च करण्याची मर्यादा निवडणूक आयोगाने घालून दिली आहे. निवडणूक संपल्यानंतर ३० दिवसांच्या आत निवडणूक खर्च प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागतो.