एमपीएससी परीक्षा देण्याला ६-९ संधीचे बंधन, विद्यार्थ्यांमधून नाराजी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:34 AM2021-01-03T04:34:59+5:302021-01-03T04:34:59+5:30
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला सहा, मागास प्रवर्गातील परीक्षार्थीला ...
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. खुल्या प्रवर्गातील परीक्षार्थीला सहा, मागास प्रवर्गातील परीक्षार्थीला नऊ तर अनु. जाती आणि जमातीसाठी वयाच्या अटी पर्यंत. वयाच्या २१ व्या वर्षीपासून परीक्षा देता येतात आणि फक्त वयाची अट असल्याने विद्यार्थी फक्त परीक्षा देत बसतात. परीक्षा देण्यासाठी आलेल्या अटीमुळे आता नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल. अगोदर जुने विद्यार्थी वर्षानुवर्षं तयारी करत असल्यामुळे मुख्य परीक्षेस पात्र होत पण आता ते बाद झाल्या नंतर नवीन विद्यार्थ्यांना संधी मिळेल. भरपूर विद्यार्थी एकदा नोकरी मिळाल्यानंतरही वयाची अट संपेपर्यंत परीक्षा द्यायचे आता त्याच्या वर चपराक बसली. पण आता आयोगाने आणि सरकारने तत्परता दाखवत परीक्षा घ्याव्या जेणेकरून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, असे मत एमपीएससी विद्यार्थी दिनेश आत्माराम चौतमोल यांनी व्यक्त केले.
अशाप्रकारे होईल संधीची गणना
एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा परीक्षार्थी पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर परीक्षार्थी कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.
सर्वांना समान संधी हवी
एमपीएससीने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यामुळे विद्यार्थ्यांना बी प्लॅनचे नियोजन व्यवस्थित करता येईल. पण यामध्ये सर्वांना समान संधी द्यायला हवी होती, कारण निवड प्रक्रिया करताना निवड ही आरक्षणाच्या धर्तीवरच होणार आहे.
संकेत रामकृष्ण दांडगे, उमेदवार
वेळेवर सर्व प्रक्रिया पार पाडावी
एमपीएससी ने युपीएससीच्या धर्तीवर परीक्षार्थींना परीक्षा देण्यावर कमाल मर्यादा आणल्या आहेत. परंतु एमपीएससीने वेळेवर परीक्षा, निकाल आणि नियुक्ती या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे. नाहीतर नियुक्तीची वाट पाहण्यासाठी २ ते ३ वर्षे लागणार.
- संकेत संजय पवार, उमेदवार
योग्य वयात नियोजन करता येईल.
मर्यादा आल्याने विद्यार्थी योग्य नियोजन करून अभ्यास करतील आणि योग्य वेळेत नोकरीला लागतील. वास्तविक विचार करता यदाकदाचित नोकरी नाही मिळाल्यास विद्यार्थ्यांना भविष्याचा विचार योग्य वयात करता येईल. विद्यार्थ्यांना दुसरा पर्याय लवकर निवडता येईल.
निवृत्ती वसंतराव सोनुने, उमेदवार
बदलाचे सकारात्मक परिणाम येतील
महाराष्ट्र राज्य आयोगाने संघ लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर केलेला पद्धतीचा बदल हा नक्कीच सकारात्मक आहे. या बदलामुळे विद्यार्थी गांभीर्याने घेतील. सहज परीक्षा देऊन बघू असे समजून परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीचे प्रमाण कमी होईल.
सुप्रिया मादनकर, परीक्षार्थी