बुलडाणा जिल्ह्यासाठी ६ केएल ऑक्सिजन उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 11:46 AM2021-04-17T11:46:03+5:302021-04-17T11:46:10+5:30
Oxygen available for Buldana district : बुलडाणा जिल्ह्याची महिन्याची ऑक्सिजनची मागणी ही सध्या ३७५ मेट्रीक टन आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात लिक्विड ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलला युद्धपातळीवर करण्यात आलेल्या प्रयत्नामुळे बुलडाणा जिल्ह्यास सहा केएल लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध झाला आहे. त्यामुळे आगामी आठ दिवसांची ऑक्सिजनची चिंता मिटली आहे.तूर्तास जिल्ह्यात १३ केएल लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठा दिलासा मिळाला आहे. बुलडाणा जिल्ह्याची महिन्याची ऑक्सिजनची मागणी ही सध्या ३७५ मेट्रीक टन आहे. दररोज १२.७३ मेट्रीक टन ऑक्सिजन जिल्ह्यास लागतो.
दरम्यान, युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यास दुपारी ६ केएल ऑक्सिजन उपलब्ध झाले. सोबतच येत्या तीन दिवसांमध्ये आणखी १० केएल ऑक्सिजन जिल्ह्यास उपलब्ध होणार आहे. बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयात उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकची क्षमता ही २० केएलची आहे.
दुसरीकडे आगामी काळात जिल्ह्यातील ऑक्सिजनचा पुरवठा हा सुरळीत होणार असल्याचे संकेत आरोग्य विभागातील सूत्रांनी दिले आहेत.
यासंदर्भात मुंबई येथे उघडण्यात आलेल्या एफडीएच्या नियंत्रण कक्षास नियमित स्वरुपात ऑक्सिजनची जिल्ह्यात नेमकी गरज किती आहे, याची माहिती देण्यात येत असते.