शाळा सुरू करण्याला जिल्ह्यातील ६२४ शाळांनी दिली नकार घंटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 11:51 AM2020-07-06T11:51:07+5:302020-07-06T11:51:46+5:30
शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढतच आहे. नववी ते बारावीच्या नियमीत शाळा सुरू करण्याबाबत शाळा समिती व पालकांची भूमिका जाणून घेण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील ६२४ शाळांनी नकार घंटा दिली आहे. शिक्षण संस्थाबरोबर पालकांमधूनही नाराजी दर्शविण्यात येत असल्याने नववी ते बारावीचे वर्ग जुलैमध्ये सुरू करण्याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
नवीन शैक्षणिक सत्रामध्ये इयत्ता नववी, दहावी व बारावीचे वर्ग जुलै महिन्यापासून सुरू करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाच्या सुरू आहेत. परंतू प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत शैक्षणिक संस्था आणि पालक यांची पातळीवर हा निर्णय होईल, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यासाठी शैक्षणिक संस्था, शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतची माहिती शिक्षण विभागाकडून मागविण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आलेल्या अहवालाची शिक्षण विभागाकडून पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे नववी ते बारावीच्या ६२४ शाळांनी शाळा सुरू करण्याबाबत नकार दर्शविला आहे. शाळा स्तरावर पालकांची सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतली असता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांनी नियमित शाळा सुरू करण्यावर नाराजीच व्यक्त केलेली आहे. अद्याप इतर काही शाळांचे अहवाल येणे बाकी असले तरी, जास्त शाळांकडून नकारात्मक सूर येत असल्याने शिक्षण विभागही अडचणीत सापडला आहे. जुलै महिन्यापासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही शाळेची उत्स्तुकता लागली होती. शासनाकडून सुद्धा शाळा सुरू करण्याबाबत लेखी स्वरूपात कुठलेच आदेश मिळालेले नाही. मात्र आता शिक्षण संस्थांनी आडकाठी घातल्याने जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग सुरू होण्याबाबत स्पष्टता दिसून येत नाही.
वाहतूकीचा प्रश्न
काही शिक्षण संस्थाकडे स्वत: च्या स्कूल बस नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात विद्यार्थी आणण्यासाठी वाहतूकीचाही प्रश्न शिक्षण संस्थांसह पालकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थी संख्या कमी असल्याने स्पेशल बसही त्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलया जाऊ शकत नाही.
काय आहे पालकांची भूमिका...
प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची ग्वाही घेणार असेल तर पालकही विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास तयार आहेत. विद्यर्थी एकत्र आल्यास धोका वाढू शकतो.
नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण संस्था व पालकांचे मत जाणून घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील ६२४ शाळांनी वर्ग सुरू करण्याला नकार दिला. शासनाकडून येणाऱ्या सुचनानुसार पुढील अंमलबजावणी करण्यात येईल.
-डॉ. श्रीराम पानझाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.