६३ व्यक्तींना काेराेनावर मात करूनही रुग्णालयात घ्यावे लागले उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:25 AM2021-07-18T04:25:06+5:302021-07-18T04:25:06+5:30
बुलडाणा : काेराेनावर मात केल्यानंतरही अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले. जिल्ह्यातील ६३ जणांना म्युकरमायकाेसिसची लागण झाली ...
बुलडाणा : काेराेनावर मात केल्यानंतरही अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागले. जिल्ह्यातील ६३ जणांना म्युकरमायकाेसिसची लागण झाली हाेती, तसेच काही रुग्णांना इतर त्रास हाेत असल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागत आहेत.
जिल्ह्यातील ८७ हजार २०० लाेकांना काेराेनाची लागण झाली आहे. त्यापैकी ८६ हजार ५१२ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यायत आली आहे. काेविडवर मात करणाऱ्यांची संख्या जास्त असली तरी कोविडमुक्त झालेल्या अनेक व्यक्ती पाहिजे ती दक्षता घेत नसल्याने, त्यांना इतर आजार जडत असल्याचे दिसून येत आहे. कोविडमुक्त झाले तरी जिल्ह्यातील ६३ रुग्णांना म्युकरमायकाेसिसची लागण झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. काेविडशी लढा देताना रोगप्रतिकारकशक्ती कमी होताच इतर आजार डोके वर काढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक कोविडमुक्त व्यक्तीने डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात आतापर्यंत ६३ म्युकरमायकोसिस बाधितांची नोंद घेण्यात आली आहे. पाच व्यक्तींचा या आजाराने बळी घेतला आहे, तसेच काेराेनातून बरे झालेल्यांना इतरही त्रास हाेत असल्याने उपचार करावे लागत आहेत.
पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना
वयाची साठी पार केलेल्या अनेक व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजार असतात. अशाच व्यक्तींना, तसेच पूर्वी विविध आजार असलेल्यांना पोस्ट कोविडचा सर्वाधिक धोका असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी सध्याच्या संकटात अधिक दक्ष राहण्याची गरज आहे.
काेराेना बरा, पण श्वसनाचा त्रास
जिल्ह्यात कोविडवर मात केलेल्यांची संख्या माेठी आहे. अनेक कोविडमुक्त व्यक्तींना सध्या चालताना धाप लागत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
काहींना काळ्या बुरशीचा आजार म्हणजे म्युकरमायकोसिस या आजाराने आपल्या कवेत घेतल्याचे पुढे आले आहे. जिह्यातील ५ जणांचा मृत्यू या आजाराने झाला आहे़ त्यामुळे काेराेनातून बरे झाल्यानंतरही काळजी घेण्याची गरज आहे़
बरे झाल्यानंतर ही घ्या काळजी
कोविडमुक्त झालेल्या व्यक्तीने घराबाहेर पडल्यावर नेहमीच मास्कचा वापर केला पाहिजे.
अशा व्यक्तीने गर्दीच्या ठिकाणी नेहमीच इतर व्यक्तीपासून किमान तीन मीटर अंतर दूर राहावे.
श्वास घेण्यास त्रास होण्यासह इतर काही त्रास होत असल्यास तातडीने नजीकच्या रुग्णालयात जाऊत डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा.
कोविडमुक्त झाल्यावर प्रत्येक व्यक्तीने विशेष काळजी घेतली पाहिजे, यात प्रामुख्याने फिजिकल डिस्टन्सिंग, तसेच मास्कचा वापर केला पाहिजे. शिवाय त्रास जाणवत असल्यास नजीकच्या रुणालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. घरगुती उपाय कोविडमुक्त व्यक्तीने करू नयेत. - डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा