६३ हजार हेक्टरवरील पिके बाधित!
By admin | Published: October 13, 2016 02:16 AM2016-10-13T02:16:37+5:302016-10-13T02:16:37+5:30
परतीच्या पावसाचा फटका बसल्यामुळे पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश.
खामगाव, दि. १२- सतत तीन वर्षापासून अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करणार्या बळीराजाला यावर्षी परतीच्या पावसाने फटका दिला आहे. परतीच्या पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ६३ हजार हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याची माहिती असून प्रशासनाने पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
गत तीन वर्षांमध्ये खरीपातील पेरणीसाठी मृगनक्षत्रात पेरणी योग्य पाऊस न झाल्याने अनेक शेतकर्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. गत वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतवृष्टीमुळे मुग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. यावर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यासह जाणकारांनी व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकर्यांनी मृग नक्षत्रामध्येच खरीपाची पेरणी केली. सुरुवातीला दमदार हजेरी लावलेल्या पावसाने २0 दिवसाची उघडीप दिली. त्यामुळे मुग, उडीद आणि सोयाबिन या तिन पिकांच्या उत्पादनात घट झाली आहे. तसेच ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सोयाबिन काढणीच्या हंगामातच परतीचा पाऊस बरसल्याने सोयाबिन पिकाचे नुकसान झाले आहे. शेतात उभ्या असलेल्या सोयाबिनला कोंब फुटले असून मातीमिश्रीत सोयाबिनच शेतकर्यांच्या पदरी पडत आहे.
महसूल विभागाने नुकसानाची माहिती घेतली असता जिल्ह्यातील ५१ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, तर १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये मुग, उडीद, सोयाबिन आणि तिळ या पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यानुसार आता नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
त्रिसदस्यीय समिती करणार पंचनामे
-पिकांच्या नुकसानाचे पंचनामे त्रिसदस्यीय समितीकडून करण्यात येणार आहे. कृषीसेवक, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून पीक नुकसानाचे पंचनामे केले जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्यासाठी शासनाला हि माहिती पाठविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या माहितीच्या आधारे विमा कंपनी देखील शेतकर्यांना नुकसानीचा लाभ देणार आहे.
नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता
-महसूल, कृषी आणि ग्रामविकास या तीन विभागाच्या कर्मचार्यांकडून पीक नुकसानाचे पंचनामे करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणी नंतर जिल्ह्यातील नुकसानाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले असून, प्रशासनाने सर्वेक्षणाचे काम तातडीने करावे, अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.