रोजी गेली, तरी ६५ हजार कुटुंबांना मिळणार रोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:35 AM2021-04-16T04:35:04+5:302021-04-16T04:35:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे आर्थिक दुर्बल घटकांना त्रास होऊ नये म्हणून मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये दारिद्र्य रेषेखालील लाेकांना एक महिनाभर माेफत धान्याचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्यासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे, राज्य शासनाने काेराेना संसर्ग राेखण्यासाठी विविध उपाय याेजना सुरू केल्या आहेत. या उपाययाेजनांतर्गंत १४ एप्रिल राेजी सायंकाळपासून राज्यभरात संचारबंदी करण्यात आली आहे. तसेच कडक निर्बंध लादण्यात आले आहे. जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्यामुळे या निर्णयाचा आर्थिक दुर्बल घटकातील लाेकांना फटका बसू नये, यासाठी राज्य शासनाच्या वतीने विविध पॅकेजची घाेषणा करण्यात आली आहे. हातावर पाेट असणाऱ्यांना शासन एक महिना माेफत धान्य देणार आहे. तसेच शिवभाेजन थालीही माेफत देण्यात येणार असून ऑटाे चालकांनाही मदतीचा हात देण्यात येणार आहे. सततच्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
तीन किलाे गहू, दाेन किलाे तांदूळ मिळणार
अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून जिल्ह्यातील तीन लाख २ हजार ८२९ लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य देण्यात येईल.
कडक निर्बंधामुळे मजुरी करणाऱ्या कुटुंबाची उपासमार हाेऊ नये यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी केंद्र सरकारने लावलेल्या लाॅकडाऊनमुळे अनेकांना माेठ्या प्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागला हाेता. विशेष परराज्यातील मजुरांचे माेठे हाल झाले हाेते.
दारिद्र्य रेषेखालील लाेकांना शासनाने माेफत धान्य देऊन दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयाचा आर्थिक दुर्बल घटकातील लाेकांना लाभ हाेणार आहे.
शासनाच्या निर्णयाचे स्वागतच
कडक निर्बंधामुळे सर्वाधिक फटका हातावर पाेट असणाऱ्यांना हाेताे. शासनाने एक महिना माेफत धान्य देण्याचा निर्णय घेतल्याने दिलासा मिळणार आहे. शासनाकडून मिळणारे हे धान्य दर्जेदार असावे, अशी अपेक्षा आहे. शासनाच्या निर्णयाचे स्वागत आहे.
किसनराव वानखडे, बुलडाणा
काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी शासनाने १४ एप्रिलच्या सायंकाळपासून कडक निर्बंध लावले आहेत. या निर्णयामुळे अनेकांचा राेजगार जाणार आहे. तसेच मजुरांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. शासनाने माेफत धान्य देण्याचा निर्णय याेग्यच आहे.
सचिन गवई, बुलडाणा
काेराेना संसर्ग राेखण्यासाठी वेळाेवेळी लावलेल्या लाॅकडाऊनमुळे दारिद्र्य रेषेखालील लाेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागताे. गेल्या वेळचा अनुभव पाहता शासनाने मदत देण्याची केलेली घाेषणा याेग्यच आहे. या निर्णयामुळे हातावर पाेट असलेल्या लाेकांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
-बाबुराव जाधव, बुलडाणा