६६९ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:35 AM2021-03-17T04:35:13+5:302021-03-17T04:35:13+5:30
बुलडाणा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या ...
बुलडाणा : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत स्वयंरोजगार उभा करण्यासाठी विविध कर्ज वितरण योजना अमलात आणण्यात आल्या आहेत. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट प्रकल्प कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना यांचा समावेश आहे. या योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत ६६९ लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरू झालेला आहे. तसेच आतापर्यंत ७७१ लाभार्थ्यांना बँकेने कर्ज प्रकरण मंजूर केले आहे.
या कर्ज प्रकरणांमध्ये २६७ कोटी ६४ लक्ष ५६ हजार ८७४ रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ३७७६ अर्जदारांनी अर्ज केले. त्यापैकी १०८२ लाभार्थ्यांना (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले आहे. म्हणजे १०८२ लाभार्थी पात्र ठरले. यापैकी ७७१ लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. महामंडळाकडून ७०८ लाभार्थ्यांना व्याज परतवाना मंजूर करण्यात आला. व्याज परतावा ६६९ लाभार्थ्यांना सुरू देखील झाला. आजपर्यंत ४ कोटी ६९ लक्ष ४ हजार ९१ रक्कम व्याज परताव्यापोटी वितरित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे महामंडळाची दुसरी योजना गट कर्ज व्याज परतावा आहे. यामध्ये ६ गटांनी अर्ज केले, ३ गटांना (लेटर ऑफ इंटेन्ट) देण्यात आले. यामध्ये ४२ हजार १४० रूपयांची रक्कमेचा व्याज परतावा झालेला आहे. तसेच प्रकल्प कर्ज योजनांमध्ये १९ गटांची संख्या आहे. अशाप्रकारे या तीनही योजनांचा लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा अंतर्गत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय कार्यान्वीत आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा आहे. त्यामुळे अर्ज करण्यास लाभार्थ्यांना सुविधा आहे. अर्ज केल्यानंतर बँकेकडे सदर प्रकरण मंजूरीसाठी पाठविण्यात येते. बँकेले पाठविण्यासाठी लेटर ऑफ इंटेन्ट देण्यात येते. लेटर ऑफ इंटेन्ट बँकेकडे देण्यात आल्यानंतर सदर कर्ज प्रकरणात कर्जाची रक्कम देण्यात येते. तरी अधिक माहितीसाठी महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम अंभोरे यांनी केले आहे.