साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे ६७५ कर्जदार अडचणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 11:56 PM2017-12-19T23:56:14+5:302017-12-19T23:56:39+5:30
सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, ६७५ कर्जदार अडचणीत सापडले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेच्या अधिकार्यांनी कर्ज वसुलीच्या नावाखाली ६७५ शेतकर्यांचे नव्याने पुनर्गठन करून त्यांना नवीन कर्ज वाटप केले आहे. ते सर्व कर्जदार कर्जमाफीत बसतात की त्यांच्या नावे ते कर्ज कायम राहते, अशी शक्यता वर्तविण्यात येत असून, ६७५ कर्जदार अडचणीत सापडले आहेत.
जिल्हा को ऑप बँक अवसायनात गेल्यानंतर थकीत कर्जदार शेतकर्यांकडून मोठय़ा प्रमाणात कर्ज वसुलीचा सपाटा लावला होता. साखरखेर्डा येथे कर्ज वसुली अधिकारी आणि सोसायटीचे सचिव यांनी सवडद, मोहाडी, शिंदी, राताळी, गुंज, वरोडी, गोरेगाव आणि उमनगाव येथील शेतकर्यांसोबत संपर्क साधून बँक वाचवायची असेल तर तुमचे कर्ज नवे-जुने करणे आवश्यक आहे. यासाठी सातबारा, स्टँप पेपर आणि अर्ज स्वत: भरून बँकेचे कर्ज वसुली अधिकारी शंकरराव जाधव यांनी ६७५ शेतकर्यांनी कर्ज भरल्याचे दाखवून त्यांना निलचा दाखला दिला आणि नवीन कर्जही वाटप केले. त्यामुळे ते शेतकरी थकीत कर्जाच्या यादीतून बाद झाले. ज्या १0४ शेतकर्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले नव्हते ते सर्व कर्जदार आज कर्जमाफीत बसले आहेत; परंतु ६७५ शेतकरी या कर्जमाफीत बसले नाहीत, असा आरोप जिल्हा शिवसेना उपप्रमुख बाबुराव मोरे यांनी केला आहे. विशेष म्हणजे शंकरराव जाधव आणि संजय पंचाळ या दोघांनी हा खटाटोप बँकेला सहकार्य करण्याच्या भूमिकेतून केला असला तरी या प्रकरणात सामान्य शेतकरी गोवल्या गेला आहे. या सर्व शेतकर्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्जही भरले होते; परंतु त्यातील एकाही शेतकर्याला कर्जमाफीचा मॅसेज आला नाही. त्यामुळे आपण कर्जमाफीत बसतो की नाही, हा प्रश्न या शेतकर्यांना निर्माण झाला आहे. त्यामुळे कर्जदार शेतकरी सध्या बँकेत वारंवार चकरा मारत असल्याचे दिसून येत आहे.
शेतकर्यांनी स्वत:हून कर्जाचे पुनर्गठन केले असून, आम्ही जबरदस्ती केली नाही. थकीत कर्जदार कर्जमाफीत बसले आहेत. नव्याने कर्ज ज्यांनी घेतले या बाबत काहीही सांगू शकत नाही. हा निर्णय बँकेचा आहे.
- संजय पंचाळ, सचिव,
ग्रामसेवा सहकारी सोसायटी
साखरखेर्डा येथील जिल्हा को-ऑप बँकेचे शाखा निरीक्षक, कर्ज वसुली अधिकारी आणि ग्रामसेवा सहकारी सोसायटीचे सचिव यांनी शेतकर्यांच्या घरी जाऊन काही शेतकर्यांच्या सह्या घेतल्या. तर काही शेतकर्यांना विश्वासात न घेता त्यांचे कर्ज परस्पर निल करून नव्याने कर्ज वाटप केल्याचे कागदोपत्री दाखविले आहे. आज ते सर्व ६७५ कर्जदार कर्जमाफीत बसले नाहीत. ही बँकेने सरळसरळ त्यांची फसवणूक केली आहे.
- बाबुराव मोरे,
शेतकरी तथा जिल्हा शिवसेना उपप्रमुख.