ज्ञानगंगा नदीतून दररोज ७ लाखांची वाळू चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 11:33 AM2021-02-15T11:33:11+5:302021-02-15T11:33:33+5:30
Khamgaon News महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यासह पोलीस, गाव समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या पिंपळगाव राजामधील ज्ञानगंगा नदीमध्ये वाळू माफियांकडून दररोज ५ ते ७ लाखांची वाळू तस्करी होत असून याकडे महसूलच्या संबंधित अधिकाऱ्यासह पोलीस, गाव समितीकडून दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार घडत आहे.
आठवड्यात नुकत्याच घडलेल्या वाळू माफियांच्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. उमरखेड येथील नायब तहसीलदार व तलाठी यांच्यावर चाकूने वार झाले. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले. गेल्यावर्षी तर जलंब येथील वाळू माफियांनी चक्क एका पोलीस कॉन्स्टेबलला जागेवरच चिरडून टाकले होते. महसूल विभागाकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. त्याला पायबंद न घातल्यास अनुचित प्रकार घडू शकतो, अशी भीती सर्वसामान्यांमध्ये आहे.
उपविभागीय अधिकारी खामगाव यांना रेतीमाफिया करीत असलेल्या वाळू चोरीबाबत निवेदन दिले. अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. वरिष्ठांनी लक्ष द्यावे.
-मोहम्मद हसन अब्दुल खालीक इमानदार, विदर्भ अध्यक्ष, मायनारिटी डेमोक्रेटिक पार्टी, पिंपळगाव राजा