७० ग्रामपंचायतींचीही फेब्रुवारी अखेर निवडणूक?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:47+5:302021-02-07T04:32:47+5:30
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मधल्या काळात झाल्या असल्या तरी या ना त्या कारणाने या ग्रामपंचायतींमधील रिक्त राहिलेल्या ...
बुलडाणा : जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका मधल्या काळात झाल्या असल्या तरी या ना त्या कारणाने या ग्रामपंचायतींमधील रिक्त राहिलेल्या जागांसाठी तथा आणखी ७० ग्रामपंचायतींसाठी फेब्रुवारी महिन्या अखेरीस निवडणूक होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अशा ७० ग्रामपंचायतींसह रिक्त राहिलेल्या काही जागा अशा जवळपास १०३ जागांच्या निवडणुकीमुळे राजकारण तापणार आहे.
जिल्ह्यातील ५२७ ग्रामंपचायतींच्या निवडणुका जानेवारी महिन्यात झाल्या असून सरपंच निवड आता तीन टप्प्यांत अर्थात ९ ते ११ फेब्रुवारीदरम्यान होईल. यामुळे तेराही तालुक्यांत सध्या गावकारभारी कोण होणार याविषयी उत्सुकता आहे. ही उत्सुकता कायम असतानाच ७० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि रिक्त जागांसाठीही निवडणूक होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यादृष्टीने मतदार यादी कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक तथा नुकत्याच पार पडलेल्या ५२७ ग्रामपंचायतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांचा यात समावेश आहे.
बुलडाणा व सिंदखेडराजा वगळता अन्य ११ तालुक्यांतील या जागा आहेत, यासाठी १५ जानेवारी २०२१ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सरपंच निवडीची अंतिम टप्प्यातील धामधूम सुरू असताना ११ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येऊन १६ फेब्रुवारीपर्यंत हरकती व सूचना प्राप्त झाल्यावर १८ फेब्रुवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे चालू महिन्याच्या अखेरीस या ग्रामपंचायतींसाठी तथा रिक्त जागांसाठी निवडणूक होण्याचे संकेत आहेत.