भगर, आमटीमधून तब्बल ७०० जणांना विषबाधा; रुग्णालयाच्या आवारातच झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:16 AM2024-02-22T06:16:49+5:302024-02-22T06:17:18+5:30

बुलढाणा जिल्ह्यातील खापरखेड, सोमठाणा येथे भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये एकादशीनिमित्त भगर, आमटीचा प्रसाद खाल्ल्यामुळे ४०० जणांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.

700 people get food poisoning in Buldhana district | भगर, आमटीमधून तब्बल ७०० जणांना विषबाधा; रुग्णालयाच्या आवारातच झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन

भगर, आमटीमधून तब्बल ७०० जणांना विषबाधा; रुग्णालयाच्या आवारातच झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन

बुलढाणा/हिंगोली/नंदुरबार: मंगळवारी असलेल्या माघी वारीनिमित्त भगर आणि आमटी खाल्ल्याने राज्यात बुलढाणा, हिंगोली आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यात मिळून ७०० जणांना विषबाधा झाली आहे. त्यामध्ये सर्वात जास्त ४०० जण बुलढाणा जिल्ह्यातील, तर हिंगोलीत १५० आणि नंदुरबार जिल्ह्यातील १५० जण आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील खापरखेड, सोमठाणा येथे भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये एकादशीनिमित्त भगर, आमटीचा प्रसाद खाल्ल्यामुळे ४०० जणांना त्रास होऊ लागला. त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन लावण्यात आले. 

हिंगोलीत १५० जणांना बाधा; प्रकृती स्थिर

हिंगोली जिल्ह्यातील रेणापूर येथेही मंगळवारी भगर खाल्याने १५० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून सर्वांना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

नंदुरबार : महाप्रसादातून १५० जणांना बाधा

रनाळे, (ता. नंदुरबार) येथे मंगळवारी रात्री आयोजित भंडारा-महाप्रसादाच्या कार्यक्रमात अन्नातून विषबाधा झाल्याने दीडशेपेक्षा अधिक जणांना त्रास जाणवू लागला होता. त्यातील १०० पेक्षा अधिक जणांवर उपचार करून लागलीच घरी सोडून देण्यात आले तर ३० जणांवर रनाळे ग्रामीण रुग्णालयात व २५ जणांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

Web Title: 700 people get food poisoning in Buldhana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.