एकाच दिवशी ७३ वीज चो-या पकडल्या!
By admin | Published: July 2, 2016 01:02 AM2016-07-02T01:02:36+5:302016-07-02T01:02:36+5:30
३४ पथकांकडून बुलडाणा, मलकापूर, मेहकर, खामगाव व शेगाव शहरांमध्ये कारवाई.
बुलडाणा : जिल्हाभरात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, यामुळे वज वितरण कंपनीला मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीने ७३ वीज चोरट्यांवर २९ जून रोजी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई पाच विभागात करण्यात आली असून, यात चोरट्यांकडून विद्युत मीटर जप्त करण्यात आले.
बुलडाणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्यावतीने अधीक्षक अभियंता जी. एम कडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम बुधवारी राबविण्यात आली. यामध्ये बुलडाणा, मलकापूर, मेहकर, खामगाव व शेगाव शहरांमध्ये ही मोहीम यशस्वीरीत्या राबविली. या मोहिमेत ३४ वीज चोरी पथके कार्यरत होती. तसेच १७९ कर्मचार्यांचा सहभाग होता. मोहिमेदरम्यान वीज कायदा कलम १३५ व १२६ अंतर्गत तब्बल ७९ वीज चोरी प्रकरणे पकडण्यात आली. त्यांच्याकडील वीज मीटर जप्त करण्यात आले आहे.
मोहिमेंतर्गत बुलडाणा शहरामध्ये २0, मलकापूर २३, मेहकर १८, खामगाव सहा आणि शेगाव सहा, अशा वीज चोरी पकडण्यात आल्या. या मोहिमेमुळे वीज चोरी करणार्या ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच या प्रकारची मोहीम यानंतर सुद्धा बर्याच ठिकाणी राबविण्यात येणार आहे. त्यामुळे कोणत्याही वीज ग्राहकाने अवैधपणे वीज वापर करू नये, असे आवाहन वीज वितरण कंपनीकडून करण्यात आले आहे.
पथकात १७९ कर्मचार्यांचा सहभाग
सकाळपासून जिल्ह्यातील पाचही शहरातील विविध भागात पथकांची विज मीटर तपासणी मोहीम सुरु झाली. यात जिल्हा विज वितरण कंपनी बुलडाणा विभागाचे कार्यकारी अभियंता झिजीलवार, खामगाव विभागाचे शिंदे, मलकापूर विभागाचे पवार व कार्यकारी अभियंता सोनकुसळे यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आली होती. यात विज वितरण कंपनीचे तांत्रिक कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी असे १७९ कर्मचारी सहभागी झाले होते. पथकांच्या कार्यवाही नंतर शहरांमधील विज चोरट्यांना धडकी भरली आहे.