रेशन कार्डवरील ७५ हजार नावे होणार कमी!

By admin | Published: April 2, 2017 01:57 AM2017-04-02T01:57:18+5:302017-04-02T01:57:18+5:30

आधार लिंकिंग न केल्याचा परिणाम; खामगावकरांनी दाखवली उदासीनता.

75 thousand names on ration card will be reduced! | रेशन कार्डवरील ७५ हजार नावे होणार कमी!

रेशन कार्डवरील ७५ हजार नावे होणार कमी!

Next

खामगाव, दि. १- तालुक्यातील जवळपास ७५ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग न झाल्याने त्यांची नावे रेशन कार्डवरून वगळली जाणार आहेत. विशेषत: खामगाव शहरातील रहिवाशांनी आधार लिंकिंगबाबत उदासीनता दाखवलेली आहे.
तालुक्यातील सर्वच प्रकारच्या रेशनकार्डधारक कुटुंबांची एकूण संख्या ५२ हजार ५७१ असून, एकूण लाभार्थीसंख्या २ लाख ६0 हजार आहे. या सर्व लाभार्थींचे आधार लिंकिंग करुन घेण्याची प्रक्रिया तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याकरिता नागरिकांना आपला आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते. यासाठी वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली.
मागील आठवड्यातही पुरवठा विभागाने प्रसिद्धीपत्रक काढून २७ मार्चपर्यंत आधार लिंकिंग करून घेण्याचे आवाहन केले. तसेच खामगाव शहरात तीन दिवस ऑटोरिक्षा फिरवून जाहीर आवाहन करण्यात आले. मात्र, नागरिकांनी याबाबत मोठय़ा प्रमाणात उदासीनता दाखविल्याचे दिसून येते. मार्चअखेरपर्यंत १ लाख ७८ हजार लाभार्थींचे आधार लिंकिंग झालेले असून, मागील आठवड्यात राबविलेल्या प्रचार मोहिमेतून केवळ सात हजार आधार लिंकिंगचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यांची आधार लिंकिंगची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तब्बल ७५ हजार लाभार्थींचे अर्जच अद्याप न आल्याने आता या लाभार्थींची नावे रेशनकार्डवरून कमी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आधार लिंकिंग न झालेली सुमारे ७0 टक्के नावे ही खामगाव शहरातील असून, शहरवासीयांनी याबाबत प्रचंड उदासीनता दाखवल्याचे दिसून येते.

मुदत आणखी वाढविण्याची मागणी
आधार लिंकिंगअभावी स्वस्त धान्यासह शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची पाळी लाभधारकांवर येऊ शकते. त्यामुळे आधार क्रमांक रेशन कार्डशी जोडून घेण्याकरिता प्रशासनाने आणखी मुदतवाढ द्यायला हवी, अशी मागणी रेशन कार्डधारकांकडून होत आहे.

गैरप्रकारांना बसणार आळा
अनेक लाभार्थींची नावे दोन-दोन ठिकाणी रेशन कार्डवर असल्याचे आधार लिंकिंग प्रक्रियेत दिसून आलेले आहे. विशेषत: लग्न होऊन सासरी जाणार्‍या मुलींच्या बाबतीत असे होताना दिसते. तसेच बाहेरगावी निघून गेलेल्यांची नावे रेशन कार्डवर आहेत. त्यांच्या नावे धान्याची उचल केली जाते. अशा अनेक गैरप्रकारांना आधार लिंकिंगमुळे आळा बसणार असून, शासनाचे नुकसान टळणार आहे.

धान्य उचलण्यासाठी थम्ब मशीन!
आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानावर धान्य घेण्यासाठी गेलेल्या लाभार्थीला त्या ठिकाणी असलेल्या थम्ब मशीनवर अंगठा ठेवावा लागणार आहे. त्यानंतर धान्याची उचल होणार आहे. यामुळे शासकीय योजनेचा लाभ प्रत्यक्षात किती लोक घेतात व स्वस्त धान्य दुकानातून किती प्रमाणात धान्य विक्री होते, याचा अंदाज लागणार आहे.

Web Title: 75 thousand names on ration card will be reduced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.