मुख्यमंत्री राेजगार याेजनेंतर्गत ७५ युवकांना मिळाले कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:34 AM2021-02-10T04:34:55+5:302021-02-10T04:34:55+5:30
बुलडाणा : राज्यातील सुशिक्षित युवक, युवतींसाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री राेजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ३७३ ...
बुलडाणा : राज्यातील सुशिक्षित युवक, युवतींसाठी राज्य सरकारच्यावतीने मुख्यमंत्री राेजगार निर्मिती कार्यक्रम सुरू केला आहे. या याेजनेंतर्गत जिल्ह्यातील ३७३ युवक-युवतींनी जिल्हा उद्याेग केंद्राच्या माध्यमातून अर्ज केले आहेत. त्यापैकी ७५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
बेराेजगारी कमी करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध याेजना राबवल्या जातात. बेराेजगार युवकांना राेजगार उभारण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने राज्य शासनाने मुख्यमंत्री राेजगार याेजना सुरू केली आहे. या याेजनेसाठी लागणारी कागदपत्रे गाेळा करताना युवक त्रस्त हाेत आहेत. तसेच याेजनेची माहिती युवकांपर्यंत न पाेहोचल्याने जिल्हा उद्याेग केंद्राच्या माध्यमातून केवळ ३७३ युवकांनी ऑनलाईन अर्ज केले हाेते. त्यापैकी ७५ युवकांचे अर्ज बॅंकांनी मंजूर केले आहेत. तसेच उर्वरित युवकांचे अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. राेजगार निर्मिती करण्याच्या उद्देशाने ही याेजना सरकारने आणली आहे. या याेजनेंतर्गत ६० ते ८० टक्के बॅंकेकडून कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्यासाठी १० टक्के स्वत:चे भांडवल असावे लागते. अर्जदार १० ते २५ लाखांपर्यंत उद्याेग असल्यास ७ वी पास आणि २५ ते ५० लाख असल्यास १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
याेजनेविषयी आणखी जनजागृतीची गरज
बेराेजगार युवकांना राेजगार उपलब्ध हाेण्यासाठी ही याेजना प्रभावी ठरणार आहे. मात्र, या याेजनेची पाहिजे त्या प्रमाणात जनजागृतीच झाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, अनेक बेराेजगार युवकांना या याेजनेविषयी माहितीच नसल्याचे चित्र आहे. काेराेनामुळे लाॅकडाऊन करण्यात आल्याने सर्वच उद्याेगधंद्यांना फटका बसला. त्यामुळे, नवीन उद्याेग सुरू करण्याचा प्रयत्न करण्यास कुणीही धजावत नसल्याने या याेजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.
अटीमुळेही युवक त्रस्त
या याेजनेसाठी ५ ते १० टक्के अर्जदाराचे भांडवल लागते. शिवाय उद्याेगाचा प्रस्ताव व इतर बाबींची पूर्तता करताना युवकांना कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे, या याेजनेकडे युवक वळत नसल्याचे चित्र आहे. अर्ज कसा करायचा, कुठे मंजूर हाेतात, याविषयी माहितीच नसल्याचे चित्र आहे.