गेल्या वर्षभरात ७६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:43+5:302021-01-10T04:26:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : गेल्या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गेल्या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने रेतीमाफियांविरोधात महसूल विभागाने केलेल्या कारवाई दरम्यान असे प्रकार घडले आहेत.
गत वर्षभरात शासकीय कामकाजात अडथळा आणून प्रसंगी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याच्या ७६ घटना घडल्या होत्या. पोलीस प्रशासनाने या ७६ प्रकरणांत कारवाई करून आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे २०१९ मध्ये ६८ शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाले होते. त्यामध्ये पोलिसांनी ६७ प्रकरणांत गुन्हे दाखल करून दोषींवर कारवाई केली होती.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षभरात महसूल, बँक अधिकारी, दुय्यम निबंधक, तहसील कार्यालयातील कर्मचारी आणि काही पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने महसूल आणि बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हे हल्ले झालेले आहेत. कृषी विभागातील अधिकारी आणि पोलिसांवरही हल्ले झाल्याच्या अपवादात्मक घटना आहेत.
सर्वच प्रकरणांत पोलिसांची कारवाई
पोलीस प्रशासनाने गेल्या वर्षभरात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या ७६ जणांविरोधात कारवाई केली आहे. दरम्यान, कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान प्रतिबंधित क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या काही पोलिसांवरही हल्ले होण्याचे प्रकार घडले होते. वर्षाच्या अखेरीस चिखली येथील दुय्यम निबंधकाला मारहाण झाली होती.
महसूल कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक हल्ले
जिल्ह्यात गेल्या वर्षात सर्वाधिक हल्ले हे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांवर झाले आहेत. रेतीचे उत्खनन बंद असल्याने या प्रकरणात कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हे हल्ले झाले असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी सांगितले.