बुलडाणा जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी अद्यापही परराज्यात अडकून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 11:39 AM2020-04-27T11:39:56+5:302020-04-27T11:40:05+5:30

या विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

76 students from Buldana district still stuck in other states | बुलडाणा जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी अद्यापही परराज्यात अडकून!

बुलडाणा जिल्ह्यातील ७६ विद्यार्थी अद्यापही परराज्यात अडकून!

Next

- योगेश देऊळकार  
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील शिक्षणानिमित्त गेलेले ७६ विद्यार्थी पाच वेगवेगळ्या राज्यात ‘लॉकडाउन’मुळे अडकून पडले आहेत. या विद्यार्थ्यांना स्वगृही परतण्यास केंद्र शासनाने मुभा दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून मात्र या विद्यार्थ्यांना परत आणण्यासंदर्भात कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या सर्व परिस्थितीमुळे पालक मात्र चिंतेत सापडले आहेत.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात ३ मे पर्यंत ‘लॉकडाउन’ आहे. ‘लॉकडाउन’ जाहीर होण्यापूर्वीपासून शिक्षणानिमित्त परराज्यात गेलेले अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी परवानगी काढून त्यांना ‘लॉकडाउन’च्या पहिल्या टप्प्यातच परत आणले आहे. मात्र राज्यातील ‘कोरोना’बाधितांची वाढती संख्या पाहता काही विद्यार्थ्यांना परत येण्यास परवानगी नाकारण्यात आली. सद्य:स्थितीत बुलडाणा जिल्ह्यातील विद्यार्थी राजस्थान, हिमाचल प्रदेश, गुजरात, गोवा व मध्यप्रदेशमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये राजस्थानमधील कोटा येथे २९, हिमाचल प्रदेश २१, गुजरात १३, गोवा ३ तर मध्यप्रदेशमध्ये १० अशा एकुण ७६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पालकांची धडपड सुरू आहे. मात्र याकरीता प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे ठोस पाऊल सध्या उचलल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार ग्रीन व आॅरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परत आणण्यास मुभा आहे.
त्यानुसार बुलडाणा जिल्ह्यातील ‘कोरोना’बाधित रुग्णांची संख्या २१ वरून ६ वर आल्याने जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वगृही आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे.


विद्यार्थ्यांच्या नजरा घराकडे
‘लॉकडाउन’ ला जवळपास महिनाभरापेक्षा जास्त कालावधी पूर्ण झाला आहे. शाळा व खासगी शिकवणी वर्गांनादेखील सुटी देण्यात आल्याने परराज्यात अडकून असलेल्या विद्यार्थ्यांच्या नजरा आपसुकच गावाकडे वळल्या आहेत. अनेक विद्यार्थी घरी घेऊन येण्यासाठी पालकांकडे विनवणी करताना दिसून येत आहेत.


जिल्ह्यातील परराज्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनास देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना घरी सोडण्याची व्यवस्था शासन करणार आहे की पालकांना करायची आहे, याबाबत आतापर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत.
- डॉ. रामेश्वर पुरी, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.

 

Web Title: 76 students from Buldana district still stuck in other states

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.