अतिपावसामुळे ७९ हजार हेक्टरवरील तूर पिकाला धोका; शेतात पाणी साचल्याने पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव
By योगेश देऊळकार | Published: September 12, 2022 07:47 PM2022-09-12T19:47:09+5:302022-09-12T19:47:54+5:30
अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.
योगेश देऊळकार, खामगाव : जिल्ह्यात बहुतांश भागात १० सप्टेंबर रोजी सायंकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. अतिपावसामुळे शेतात पाणी साचल्याने तूर पिक पिवळे पडत असून त्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ७९ हजार ३५० हेक्टरवरील पीक धोक्यात आले असून शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
यावर्षी जिल्ह्यात खरीप पेरण्या विलंबाने झाल्या. यामुळे शेतकऱ्यांनी उडीद, मुगाकडे पाठ फिरवित सोयाबिन पिकाला सर्वाधिक पसंती दर्शविली. जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ४५३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर २ लाख २ हजार ९९७ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. या दोन्ही पिकांमध्ये आंतरपिक म्हणून तुरीची पेरणी करण्यात आली असून या पिकाचे क्षेत्र ७९ हजार ३५० एवढे आहे. आतापर्यंत योग्य वेळी व योग्य प्रमाणात झालेल्या पावसामुळे सर्वच पिके चांगली होती. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह सुरू असलेल्या पावसाचा कपाशी व मका पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्याचबरोबरच पाणी साचणाऱ्या शेतजमिनीवरील तूर पिकावरही पावसाचा परिणाम झाला आहे. अतिपावसामुळे हे पिक पिवळे पडून सुकत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्याची वाट मोकळी करावी
तूर पिक असलेल्या शेतात पाणी साचणे घातक आहे. यामुळे या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊन पीक नष्ट होण्याची भीती वाढते. मर रोगाची लागण देखील यामुळे होऊ शकते. हा धोका टाळण्यासाठी पाऊस थांबताच शेतातील पाण्याला वाट मोकळी करून द्यावी, असे आवाहन जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांनी केले आहे.
उत्पादनात घट येण्याची भीती
पाणी साचल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तूर पिक सुकत आहे. यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पिकस्थिती चांगली असताना अचानक सुरू झालेल्या परतीच्या पावसामुळे या पिकाला खूप मोठी झळ बसली आहे.
अतिपावसाचा तूर पिकावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीची झाडे सुकत आहेत. या पिकाची कृषी विभागाकडून पाहणी करून रोगावर नियंत्रण मिळविण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. - संतोष डाबरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा.
सततच्या पावसामुळे तूर पिकाची वाढ खुंटली असून पिक पिवळे पडले आहे. काही झाडे देखील सुकत आहेत. - सतीश सोनटक्के, शेतकरी जलंब.