खामगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८ अर्ज दाखल, अवसानायातील सोसायट्यांमुळे राजकारण तापले
By अनिल गवई | Published: March 31, 2023 07:41 PM2023-03-31T19:41:13+5:302023-03-31T19:55:01+5:30
दरम्यान, सहायक निबंधकांनी राजकीय दबावातून अवसानायात काढलेल्या ३० सहकारी संस्थांवरून खामगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
खामगाव : येथील बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील विविध संचालक पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारपर्यंत आठ जणांनी अर्ज सादर केले. .तथापि, शनिवार आणि रविवारी सुटी असल्यामुळे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीच अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार असल्याचे दिसून येते. दरम्यान, सहायक निबंधकांनी राजकीय दबावातून अवसानायात काढलेल्या ३० सहकारी संस्थांवरून खामगाव तालुक्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.
राज्यातील मुदत संपलेल्या २४९ पैकी निवडणुकीस पात्र असणार्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सचिव राज्य सहकारी प्राधिकरण पुणे यांनी आज, २१ मार्च रोजी घोषित केला आहे. या कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये येत्या २८ एप्रिलरोजी मतदान होणार असून, यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता राजकीय धुराळा चांगलाच उड़णार आहे. बहुचर्चित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी अतुल पाटाळे यांच्याकडे आठ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीसाठी शुक्रवारी सायंकाळपर्यंत १५४ जणांनी अर्ज नेले आहेत. मात्र, गत पाच दिवसांत केवळ आठ जणांनीच अर्ज दाखल केल्याने, आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी उमेदवारांची भाऊगर्दी होणार असल्याची चर्चा आहे.
चौकट...
अवसानायातील संस्थांचा निवडणुकीवर परिणाम
खामगाव तालुक्यातील प्रमुख ३० ग्रामसेवा सहकारी संस्था अवसानात काढण्यात आल्या आहेत. सहा. निबंधकांनी घेतलेल्या या निर्णयाचा राजकीय पक्षाकडून विरोध होत असून अवसायानातील संस्थांचा निवडणुकीवर थेट परिणाम होणार असल्याची चर्चा आहे.