बुलडाणा जिल्ह्यात आठ नवीन वीज उपकेंद्र!
By admin | Published: August 23, 2016 01:51 AM2016-08-23T01:51:55+5:302016-08-23T01:51:55+5:30
‘दिशा’ अंतर्गत शासकीय योजनांचा आढावा.
बुलडाणा, दि. २२ : ग्रामीण ज्योती योजनेतून सोयगावसह पेठ, उंद्री, लाखनवाडा, करमोडा, अशा आठ गावांचा सबस्टेशनसाठी लवकरच महावितरण काम सुरू करणार आहे. या आठ उपकेंद्रांमुळे जिल्ह्यात वीज पुरवठय़ाचे योग्य नियोजन करणे शक्य होणार आहे.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती(दिशा)च्यावतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अधिकार्यांनी जिल्ह्यात आठ उपकेंद्र सुरू करणार असल्याची माहिती दिली. यावेळी खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नरेंद्र टापरे, नगराध्यक्ष टी.डी. अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तळागळातील लोकांना न्याय मिळण्यासाठी विविध योजना आखल्या जात आहेत. विकासात्मक बदलांसाठी या योजनांची अंमलबजावणी तत्परतेने करावी, अशा सूचना खासदार प्रतापराव जाधव यांनी अधिकार्यांना केल्या.
यावेळी खासदार जाधव यांनी केंद्र शासनाच्या संबंधित व राज्य शासनाच्या अख्त्यारितील योजनांचा आढावा अधिकार्यांकडून घेतला. यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, दीनदयाळ अंत्योदय योजना, ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, कृषी सिंचन योजना, डिजिटल भारत कार्यक्रम, ग्रामीण ज्योती योजना, रुर्बन मिशन, पीक विमा योजना, सर्व शिक्षा अभियान यासह हायवे व रेल्वेच्या संदर्भातील कामांचा लेखाजोखा अधिकार्यांनी सादर केला. खा.प्रतापराव जाधव यांनी रोजगार हमीच्या कामांबाबत नाराजी व्यक्त केली. लोणारच्या सेवानवृत्त बीडीओ संदर्भात चौकशीच्या सूचनाही यंत्रणेला केल्या. अकुशल लोकांना कुशल बनविण्यासाठी पंतप्रधान कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीचे आदेश दिले. ग्रामसडक योजनेची कामे नोव्हेंबरपर्यंत मार्गी लावण्याचे सांगत आवास योजनेंतर्गत जिल्ह्यातील एकमेव निवड झालेल्या बुलडाणा शहरातील घरकुलांच्या संदर्भात यंत्रणेने पाऊले उचलण्याचे ते म्हणाले. शेगाव येथील रेल्वेस्थानकाच्या कामासंदर्भात विभाग प्रमुखांना सूचना करत जळगाव, देऊळगावराजा, मेहकर आणि चिखली येथे पोस्ट ऑफिसमध्ये रेल्वे तिकीट काऊंटर उघडण्यात यावे, असे सांगितले. यावेळी उपस्थित नसलेल्या काही विभाग प्रमुखांना नोटीस पाठविण्याच्या सूचनासुद्धा खा. जाधव यांनी केल्या. निधी केंद्राचा आणि यंत्रणा राज्य सरकारची असली तरी जिल्ह्याच्या विकासासाठी आपण जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अर्थात ह्यदिशाह्ण च्या माध्यमातून पाठपुरावा करत राहू, असे सांगून काही विभागांच्या कामांबद्दल नाराजीदेखील व्यक्त केली. यावेळी अधिकारी, शिवसेना पदाधिकार्यांची उपस्थिती होती.