बुलडाणा जिल्ह्यात लोकसंख्येच्या आठ टक्के व्यक्तींना मुद्रा लोण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 06:00 PM2018-10-24T18:00:17+5:302018-10-24T18:00:49+5:30
बुलडाणा: मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात दोन लाख नऊ हजार २९८ व्यक्तींना ६२७.३९ कोटी रुपयांचे लोण वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
बुलडाणा: मुद्रा योजनेतंर्गत जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात दोन लाख नऊ हजार २९८ व्यक्तींना ६२७.३९ कोटी रुपयांचे लोण वाटप करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत आठ टक्के व्यक्तींनी मुद्रा योजनेतंर्गत लोण घेतले असल्याचे स्पष्ट होत आहे. पळशी झाशी येथील एका युवकाने कर्ज न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याची गंभीर घटना उघडकीस आल्याच्या पृष्ठभूमीवर माहिती घेतली असता ही बाब समोर आली. दरम्यान, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र, विदर्भ कोकण ग्रामीण बँक, स्मॉल फायनान्स बँकिंग आणि नॉन बँकिंग फायनान्सतंर्गत जिल्ह्यात हे कर्ज वाटप करण्यात आले आहे. शिशू, किशोर आणि तरूण अशा तीन गटामध्ये हे कर्ज वाटप केल्या जाते. कृषी क्षेत्र वगळता सेवा आणि उत्पादन क्षेत्रात प्रामुख्याने हे कर्ज देण्यात येते. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत विचार करता बुलडाणा जिल्ह्यात मुद्रा योजनेतंर्गत कर्ज वाटपाचे प्रमाण बरे असल्याचेही सुत्रांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षाचा आढावा घेता २०१६-१७ मध्ये ७१ हजार ८१८ व्यक्तींना तीनही गटात १९८.२१ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी १९३.६९ कोटी रुपयांचे वटाप करण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये ९३ हजार १७० व्यक्तींना ३०० कोटी ३७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले गेले होते. त्यापैकी प्रत्यक्षात २९४ कोटी ८० लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. २०१८-१९ मध्ये ४४ हजार ३१० शेतकर्यांना १४५.८५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी सप्टेंबर अखरे पर्यंत १३८ कोटी २४ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
शिशू गटात थकबाकीची समस्या
प्रामुख्याने मुद्रा लोण हे सेवा आणि उत्पादन क्षेत्रात दिल्या जाते. मात्र शिशू गटात दिलेले कर्ज हे थकीत होण्याचे प्रमाण जवळपास ४९ टक्क्यांच्या आसपास असल्याचे सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. मध्यंतरी राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या (एसएलबीसी) झालेल्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला होता. त्यात ही बाब प्रकर्षाने समोर आली होती. मात्र अलिकडली काळातील अवर्षण सदृश्य स्थिती, मध्यंतरी पडलेला दुष्काळ आणि सध्याची असलेली दुष्काळ सदृश्य स्थिती पाहता हे कर्ज वसुलीबाबतही समस्या आहे. शिशू गटात साधारणत: ५० हजार रुपयापर्यंत कर्ज देण्याची सुविधा आहे तर किशोर गटात पाच लाख रुपयापर्यंत आणि तरुण गटात दहा लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची सुविधा आहे.