एसटीने खासगी डिझेल पंपांना दिले ८0 कोटी
By admin | Published: September 6, 2014 01:14 AM2014-09-06T01:14:55+5:302014-09-06T01:14:55+5:30
अनुदानीत इंधनाचा पुरवठा बंद; इंधनासाठी खासगी पंपांना सुमारे ८0 कोटी रुपये दिले
सिद्धार्थ आराख / बुलडाणा
अनुदानीत इंधनाचा पुरवठा बंद झाल्यानंतर मागील २0 महिन्यांत राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाने खासगी पंपांना सुमारे ८0 कोटी रुपये दिले. जानेवारी २0१३ पासून राज्यभरातील एसटी महामंडळाच्या बसेसला खासगी पंपावरून इंधनाचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. आता तो बंद करून एसटी महामंडळाचे स्वत:चे डिझेल पंप पुर्ववत सुरू केले असून जिल्ह्यातील सातही डेपोतील डिझेल पंप ५ सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत.
राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, विद्युत महामंडळ व विविध खासगी कंपन्यांना पुरवठा करण्यात येणार्या इंधनाचे दर हे किरकोळ विक्री दरापेक्षा जास्त होते. आधीच एसटी महामंडळाला दिवसेंदिवस होणारा तोटा त्यात डिझेलच्या किंमतीमध्ये वारंवार होणारी वाढ यामुळे एसटीला बल्क रेटने डिझल विकत घेणे परवडणारे नव्हते. त्यामुळे जानेवारी २0१३ पासून एसटीचे डिझल पंप बंद करून खासगी पंपावरून डिझल पुरवठा सुरू करण्यात आला होता. बुलडाणा जिल्ह्यात एसटीचे सात डेपो आहेत. या सातही डेपोला त्या-त्या शहरातील खाजगी पंपवरून डिझेलचा पुरवठा सुरू करण्यात आला होता. महिण्याकाठी एसटीला जवळपास ४ कोटी रूपयाचे डिझेल लागत होते. म्हणजे मागील २0 महिण्यात एसटीने खासगी पंपांना ८0 कोटी रूपये दिले. आता डिझेलचे बल्करेट कमी झाल्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने खाजगी पंपाचे डिझेल बंद करून पुन्हा स्वत:चे डिझेल पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला. बुलडाणा जिल्ह्यातील सातही पंप आजपासून सुरू झाले आहेत.
वरिष्ठांच्या आलेल्या आदेशा नंतर एसटीच्या सातही आगारात बंद अवस्थेत असलेल्या डिझेल पंपची चाचणी घेण्यात आली व आजपासून खासगी डिझेल पंपावरून डिझल घेणे बंद करण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक आगारत डिझेल उपलब्ध होणार असल्याचे विभाग नियंत्रक एन.एन.मैंद
यांच्याकडून सांगण्यात आले.
*प्रवाशांचा त्रास कमी झाला
खासगी पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या बसेसला बरेच वेळा रांगेत उभे राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांनाही ताटकळत थांबावे लागायचे.काही पंपावर एसटीला चांगली सेवाही मिळत नव्हती. अनेक ठिकाणी पंपावर वाद सुध्दा व्हायचे. त्याचा त्रास प्रवाशांनाच सहन करावा लागत होता. आता एसटीचे स्वत:चे पंप सुरू झाल्याने प्रवाशांचा होणारा त्रास वाचणार आहे.
*केपीटीएलवर पडला होता फरक
खासगी डिझल पंपावरून डिझल घेणे सुरू झाले तेव्हापासून एसटी बसेसच्या केपीटीएलमध्ये (प्रति किलोमिटर अव्हरेज)फरक पडला होता.अशा तक्रारी अनेक वाहकांच्या होत्या. काही ठिकाणी डिझल पंप बसस्थानकापासून दुर होते त्यामुळे विनाकारण इंधन जास्त लागत होते.परिणामी केपीटीएल मध्ये फरक पडत होता, तर काही पंपावर डिझल भेसळीचाही प्रकार होत हाता.