बुलडाणा जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना मिळणार दीड हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:42 AM2021-04-15T11:42:03+5:302021-04-15T11:42:19+5:30
Buldhana News : जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना राज्य शासन १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची चेन ब्रेक करण्यासाठी लावण्यात आलेल्या १५ दिवसांच्या संचारबंदीमध्ये कौटुंबिक अर्थकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता हातावर पोट असलेल्या जिल्ह्यातील ८,२६३ फेरीवाल्यांना राज्य शासन १ कोटी २३ लाख ९४ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत करणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १३ एप्रिल रोजी कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यासोबतच कडक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अर्थकारणासह समाजकारण प्रभावित होण्याची शक्यता पाहता या ‘लॉकडाऊन’चा फटका बसणाऱ्या संभाव्य घटकांसाठी ५ हजार ४४६ कोटी रुपयांचे पॅकेजही घोषित करण्यात आले आहे. त्याअंतर्गत फेरीवाल्यांनाही प्रत्येकी दीड हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने माहिती घेतली असता जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या ८,२६३ फेरीवाल्यांना मदत देण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात फेरीवाल्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीचा आकडा हा १ कोटी २४ लाख ९४ हजार ५०० रुपयांच्या घरात जाणार आहे. त्यामुळे आगामी १५ दिवसांच्या काळात रोजी-रोटीचा या फेरीवाल्यांचा निर्माण होणारा प्रश्न पाहता या आर्थिक मदतीतून त्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.