८३ टक्के शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2020 10:38 AM2020-07-14T10:38:45+5:302020-07-14T10:38:56+5:30
दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे करण्यासाठी ५ जुलैची मुदत देण्यात आली होती. मुदतीनंतरही या तक्रारींचा पाऊस सुरूच आहे. आतापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील दोन हजार ७५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यापैकी ८३ टक्के शेतकºयांना मदतीची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीन व त्यापाठोपाठ कपाशी हे दोन प्रमुख पीक सर्वात जास्त प्रमाणात घेतले जातात. परंतू यंदा सोयाबीन उगवले नसल्याचे प्रमाण वाढले आहे. मृग नक्षत्रात पाऊस चांगला झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकºयांनी पेरणी केली. परंतू शेतकºयांसमोर यंदा बोगस बियाण्याचे नवे संकट निर्माण झाले. अनेकांच्या शेतात सोयाबीन उगवलेच नाही. महाबिजसह वेगवेगळ्या कंपन्यांचे सोयाबीन बियाणे शेतकºयांनी पेरले; परंतू बियाणे न उगवल्याने त्यांना दुबार पेरणी करावी लागली. जिल्ह्यात १६ जून पर्यंत झालेल्या पावसामुळे २० जुनपर्यंत मोठ्या प्रमाणावर पेरण्या झाल्या. दरम्यान, सोयाबीन बियाणे पुढील आठ दिवसात उगवणे अपेक्षीत होते. परंतू अनेकांचे सोयाबीन उगवले नाही. सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी संबंधीत तालुक्याच्या तालुका कृषी अधिकारी यांचेकडे देण्याच्या सुचना कृषी विभागाकडून करण्यात आल्या होत्या. त्यासाठी ५ जुलैची मुदत दिली होती. आता मुदतीनंतरही सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी सुरूच आहेत. सध्या २ हजार ७५२ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी ह्या खामगाव तालुक्यातून आहेत. एकट्या खामगाव तालुक्याूतन ७२८ तक्रारी आल्या आहेत. एकूण २ हजार ९९२ हेक्टर क्षेत्रावरी बियाणे उगवले नाही. तक्रारीनंतर त्याचे पंचनामे करून संबंधित कंपनीकडे मदतीसाठी प्रस्ताव देण्यात येत आहेत. परंतू आतापर्यंत ८३ टक्के शेतकºयांना मदत मिळालेली नाही.