८३ हजार हेक्टर सूक्ष्म सिंचनाखाली!
By admin | Published: July 13, 2014 11:32 PM2014-07-13T23:32:08+5:302014-07-13T23:32:08+5:30
सिंचन पद्धतीचा वापर करणार्या शेतकर्यांची संख्या वाढतीच!
बुलडाणा : पाण्याची बचत व्हावी, पर्यायाने सिंचनाखालील क्षेत्र वाढावे या उद्देशाने सूक्ष्म सिंचन पद्धतीवर भर दिला जातो. दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी एक पर्याय म्हणून सिंचनाच्या या पद्धतीचा अवलंब करणार्या शेतकर्यांची संख्या जिल्ह्यात वर्षागणिक वाढत आहे. सूक्ष्म सिंचनाचा वापर करून गत नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील ८७ हजार लाभार्थी शेतकर्यांनी ८३ हजार ६२६ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. गत काही वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थित होती. त्यामुळे शेतकर्यांना सूक्ष्म सिंचनाचे महत्त्व कळले आणि जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनाच्या वापरात वाढ झाली. आता सूक्ष्म सिंचन योजनेअंतर्गत सर्व पिकांचा समावेश करण्यात आला असून, यामध्ये ऊस, कापूस, केळी, द्राक्षे, डाळिंब इत्यादी पिकांखाली असलेल्या सूक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढत आहे. अलीकडच्या काळात तूर, हळद, आले या पिकांसाठीही सूक्ष्म सिंचनाचा वापर होत आहे. या योजनेचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, यासाठी अनुदानही दिले जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात गत नऊ वर्षात ठिबक सिंचनासाठी ३८ हजार ३१५ लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले. त्यामुळे ४५ हजार हेक्टर पीकक्षेत्र ठिबक सिंचनाखाली आले. तुषार सिंचनासाठी ४८ हजार लाभार्थ्यांना अनुदान देण्यात आले असून, ३८ हजार ५३२ हेक्टर पीक क्षेत्रात सूक्ष्म सिंचन बसविण्यात आले आहे.
** गेल्या चार वर्षांच्या काळात जिल्ह्यातील शेतकर्यांनी दुष्काळाचे चटके सहन केले. २00९-१0 ते २0११- १२ या तीन वर्षांमध्ये जिल्ह्यात पाण्याची उपलब्धता फारच कमी होती. यादरम्यान सूक्ष्म सिंचनाकडे शेतकर्यांचा कल वाढला. या तीन वर्षांच्या काळात जिल्ह्यातील ५१ हजार ३१६ शेतकर्यांनी सूक्ष्म सिंचनाला पसंती दिली.