बुलडाणा जिल्ह्यातील ८४५ गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित
By admin | Published: January 22, 2016 01:46 AM2016-01-22T01:46:24+5:302016-01-22T01:46:24+5:30
पाच नगरपालिकांचा समावेश; सर्वात जास्त १२१ गावे मेहकर तालुक्यातील टंचाईग्रस्त.
बुलडाणा : जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील ऑक्टोबर २0१५ ते जून २0१६ या कालावधीत ८४५ गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित केले आहेत. यासोबतच देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मेहकर, नांदुरा व संग्रामपूर या नगरपालिका क्षेत्रातही पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. यामध्ये सर्वात जास्त १२१ गावे मेहकर तालुक्यातील आहेत. महाराष्ट्र भूजल अधिनियम २00९ मधील कलम २५ नुसार वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा यांच्या अहवालाअन्वये जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई घोषित केली आहे. त्यामुळे पाणीटंचाई घोषित गावांमध्ये अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोताच्या ५00 मीटर अंतरामध्ये कोणतीही व्यक्ती, कोणत्याही प्रयोजनासाठी विहिरीचे खोदकाम करणार नाही. प्रभाव क्षेत्रामधील किंवा सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतापासून एक किलोमीटर अंतरामध्ये यापैकी जे अधिक असेल अशा क्षेत्रातील विहीर तात्पुरती बंद करणे, भूजल काढण्यासाठी, विहीत करण्यात येईल. कोणतीही व्यक्ती भूजल पिण्याच्या पाण्याचा स्रोत दूषित करणार नाही, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. पाणीटंचाई घोषित गावांमध्ये सर्वात जास्त १२१ गावे मेहकर तालुक्यात असून, सर्वात कमी मलकापूर तालुक्यात १९ गावे आहेत. त्याचप्रमाणे पाच नागरी क्षेत्रातही पाणीटंचाई घोषित करण्यात आली. आहे.