८७६ कर्मचारी सांभाळणार १९९ मतदान केंद्राचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:51 AM2021-01-08T05:51:13+5:302021-01-08T05:51:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, एकूण ६० ग्रामपंचायतींसाठी होऊ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभाग सज्ज असून, एकूण ६० ग्रामपंचायतींसाठी होऊ घातलेल्या मतदानप्रक्रियेसाठी १९९ मतदान केंद्रांचा भार तब्बल ८७६ कर्मचारी सांभाळणार आहेत.
चिखली तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, १५ जानेवारी रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत तालुक्यातील चांधई, खोर व मालगणी या तीन गावांतील निवडणूक अविरोध पार आहे, तर ४ जानेवारी रोजी लढतीचे खरे चित्रदेखील स्पष्ट झाले आहे. गावोगावी राजकीय हालचालीने चांगलाच वेग घेतला आहे. निवडणूक रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांकडे आता केवळ नऊ दिवसांचा अवधी असल्याने या नऊ दिवसांत मतदारांपर्यंत पोहोचून त्यांचे मते वळविण्यासाठी सर्व उमेदवारांची लगबग वाढली आहे. दरम्यान, प्रत्यक्ष मतदान घ्यायची वेळ जवळ आली असल्याने प्रशासकीय पातळीवरदेखील मतदान प्रक्रिया यशस्वीपणो पार पाडण्यासाठी सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. या आनुषंगाने चिखली तहसील कार्यालयात निवडणूक विभाग कायरत असून, मतदार केंद्रावरील भौतिक सुविधांच्या उपलब्धतेपासून प्रशिक्षित मनुष्यबळ उभे करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. विविध विभागांच्या कर्मचाऱ्यांना याकामी नेमण्यात आले असून, त्यांची नियुक्ती, प्रशिक्षण कार्यवाही, नियम व निर्देशांची माहिती देणे याविषयी तालुकास्तरावर यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. तहसीलदार अजितकुमार येळे याकडे विशेष लक्ष देऊन आहेत.
१५ निवडणूक निर्णय अधिकारी
तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पाडण्यासाठी १५ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यरत राहणार आहेत. याशिवाय सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, झोनल अधिकारी आदी कार्यरत राहणार आहेत.
६० ग्रामपंचायतींचा समावेश
तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. या ग्रामपंचायतीतून एकूण २०२ सदस्यांची निवड केली जाणार आहे.
२०२ जागांसाठी एकूण १९९ मतदान केंद्रांवरून मतदानप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी आदींची नेमणूक केली जाणार आहे. एकूण ७९६ कर्मचारी प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर कार्यरत राहणार असून, ८० कर्मचारी राखीव राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जि. प. शिक्षक व खासगी संस्थांतील कर्मचारी यांचा समावेश आहे.