खामगाव येथील निवारा गृहातून ८८ जणांना घरी पाठविले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 05:36 PM2020-05-10T17:36:13+5:302020-05-10T17:36:21+5:30
रविवारपर्यंत टप्प्याटप्याने ८८ मजुरांना सोडण्यात आल्याने आता निवारागृहात केवळ १९ परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : येथील शासकीय निवारागृहातून आतापर्यंत ८८ मजुरांना घरी पाठविण्यात आले आहे. कोरोना संचारबंदी काळात खामगाव येथील मुलींच्या वस्तीगृहातील निवारागृहात महाराष्ट्रासहीत परराज्यातील १०७ मजूर अडकून पडले होते. दरम्यान, रविवारपर्यंत टप्प्याटप्याने ८८ मजुरांना सोडण्यात आल्याने आता निवारागृहात केवळ १९ परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.
कोरोना या विषाणू संक्रमनामुळे देशात अचानक लॉकडाउन जाहीर झाला. २३ मार्च पासून सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यात मजुरीसाठी गेलेले स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, प्रवासी आणि यात्रेकरू विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. यामध्ये खामगाव येथील निवारा गृहात १ एप्रिल रोजी १०७ मजुरांना क्वारंटीन करण्यात आले. दरम्यान, यापैकी २२ दिवस पूर्ण झालेल्या आणि महाराष्ट्र राज्यातील असलेल्या ३६ मजुरांना २२ एप्रिल रोजी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार घरी पाठविण्यात आले होते. त्यानंतर निवारागृहात परप्रांतीय ७१ मजूर अडकून पडले होते. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने एक गाइडलाइन्स जारी करीत परराज्यात अडकलेल्यांना आपापल्या घरी जाण्याची मुभा दिलीे. त्यानंतर निवारागृहातील ७१ पैकी ५२ स्थलांतरीत मजुरांना टप्प्या-टप्प्याने घरी पाठविण्यात आले. सुरूवातीला १४ मजुरांना घरी पाठविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी ०३ मजुरांना तर शनिवारी ०३ मजुरांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, रविवारी निवारागृहातील ३२ मजुरांना सोडण्यासाठीची प्रक्रीया पूर्णत्वास आल्याने त्यांनाही रविवारी सकाळी घरी पाठविण्यात आले. आता निवारागृहात केवळ १९ स्थलांतरीत परप्रांतीय मजूर शिल्लक आहेत.
१९ मजुरांना १३ तारखेला सोडणार!
निवारागृहात वास्तव्यास असलेल्या १९ जणांना बुधवारी अमरावती येथे सोडण्यात येणार असल्याचे समजते. तत्पूर्वी रविवारी सकाळी बिहारच्या ३२ जणांना खामगाव येथून अमरावतीसाठी नेण्यात आले. महसूल प्रशासनातील अधिकारी या मजूरांना सोडण्यासाठी अमरावती येथे गेलेत.
खामगाव येथील निवारागृहात वास्तव्यास असलेल्या ८८ जणांना आतापर्यंत सोडण्यात आले. रविवारी बिहारच्या ३२ जणांना अमरावती येथे पाठविण्यात आले आहे. तेथून त्यांना विशेष रेल्वेने गावी सोडण्यात येईल.
- शितलकुमार रसाळ
तहसीलदार, खामगाव.