राहेरी पुलासाठी ९ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:31+5:302021-05-14T04:34:31+5:30
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या एका बैठकीस या कामासाठी तत्त्वत: ...
सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत फेब्रुवारी महिन्यात घेतलेल्या एका बैठकीस या कामासाठी तत्त्वत: मान्यता दिली होती. सोबत अनुषंगिक प्रस्ताव पाठविण्यात आला होता. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी राहेरी पुलाचे आर. के. गुप्ता आणि अनुप सूर्यवंशी यांनी संरचनात्मक ऑडिट करत धोकादायक बनलेल्या या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे सुचविले होते. तसेच पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, या पुलाच्या पुनर्निर्माणाचा प्रश्न कायम होता.
नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद विभागांतर्गत हा रस्ता येतो. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक हा पूल आहे. हा जुना पूल हा १९७१-७२ मध्ये उभारण्यात आला होता.
--४१ किमीचा पडतो फेरा--
या धोकादायक पुलावरून सध्या जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा पडत आहे. या पुलाचे पुनर्निर्माण झाल्यास हा फेरा वाचेल. तसेच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस चालना मिळण्यास मदत होणार आहे.
--भूसंपादनाची प्रकरणे मार्गी लावा--
बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाची आणखी काही कामे होऊ घातलेली आहेत. मात्र, भूसंपादनाच्या काही अडचणीमुळे त्यात व्यत्यय येत आहे. याप्रकरणी भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी व संबंधित यंत्रणेतील अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन ही प्रकरणे त्वरित मार्गी लावल्यास बुलडाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाचीही कामे मार्गी लागण्यास मदत होईल. त्यासाठी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सहकार्य करावे, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनुषंगिक पत्रात म्हटले आहे.