गौण खनिजाचे अवैध खोदकामप्रकरणी ९ लाखांचा दंड; मेहकर तहसिलची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 02:01 PM2018-07-20T14:01:20+5:302018-07-20T14:02:41+5:30
जानेफळ : गौण खनिजाचे अवैध खोदकाम व वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर तहसिलदारांनी जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालकाविरोधात कारवाई करून त्यांना नऊ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.
जानेफळ : गौण खनिजाचे अवैध खोदकाम व वाहतूक केल्याप्रकरणी मेहकर तहसिलदारांनी जेसीबी मालक व ट्रॅक्टर मालकाविरोधात कारवाई करून त्यांना नऊ लाख १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. जानेफळ येथील बायपास मार्गावर असलेल्या शेख नुरा शेख इमाम यांच्या शेतातील टेकडीचे जेसीबी मशीनद्वारे (एमएच-२८-५७१७) अवैधरित्या खोदकाम करण्यात आले होते. सोबततच ट्रॅक्टर क्रमांक एमएच-२८-ईओ-२२८ द्वारे तेथील मुरुमाची अवैधरित्या वाहतूक करण्यात आली होती. यासंदर्भात १३ जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर तहसिलदार संतोष काकडे यांनी घटनास्थळ गाठून कारवाई केली होती. जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर ट्रॉली त्यावेळी जप्त करून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली होती. सोबतच या प्रकरणात पुढील कार्यवाही प्रस्तावीत केली होती. त्यानुषंगाने २० जुलै रोजी या प्रकरणात जेसीबी मशीन मालक नितीन ठाकरे यास सात लाख ५० हजार रुपये दंड तर ट्रॅक्टर मालकास एक लाख सहा हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मेहकर तहसिल कार्यालयाने केलेल्या या धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या गौण खनिजाचे खोदकाम तथा वाहतूक करणार्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तहसिल कार्यालय जानेफळ प्रकरणाप्रमाणेच अन्यत्रही धडक कारवाई करण्याचे संकेत आहेत.