९0 टक्के शेतकर्यांनी भरले कर्जमाफीचे अर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:19 AM2017-09-11T01:19:04+5:302017-09-11T01:20:16+5:30
कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्यांनी नोंदणी केली होती. शासनाने अर्ज भरण्यासाठी गावोगावी केंद्र उभारल्याने आजपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्यांना ऑनलाइन अर्ज भरता आले आहेत. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी येणार्या अडचणींची शर्यत पार करून नोंदणीकृत शेतकर्यांपैकी ८९.३२ टक्के शेतकरी अर्ज भरण्यात यशस्वी झाले.
शेतकर्यांना कर्जमाफीचा लाभ देताना खरे लाभार्थी यापासून वंचित राहू नये, एकाच शेतकर्यांकडून दोन वेळा अर्ज येऊ नये तसेच चुकीच्या लाभार्थींना या योजनेचा लाभ होऊ नये, यासाठी शासनाने कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन स्वीकारण्याची सुविधा निर्माण केली आहे. त्याकरिता गावोगावी संगणकप्रणाली विकसित करण्यात आली आहे. अर्ज भरण्याची जबाबदारी शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान म्हणजेच आय.टी. विभागावर आहे, तर ही माहिती पुरविण्याचे काम सहकार खात्यावर आहे. ऑनलाइन प्रणालीमुळे कर्जमाफीचे काम सुलभ झाले; मात्र काही ठिकाणी विविध अडचणी आल्याने शेतकर्यांना अर्ज भरता आले नाहीत. कर्जमाफीचे अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असून, शासन स्तरावरून ते दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या अडचीणीनंतरही जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ४२ हजार ५३४ अर्ज भरण्यात आले आहेत. कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जासाठी जिल्ह्यातील ३ लाख ८३ हजार ४५७ शेतकर्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८९.३२ टक्के शेतकर्यांचे अर्ज भरण्यात आले आहेत. १५ सप्टेंबर अर्ज भरण्याची शेवटची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ पाच दिवस अर्ज भरण्यासाठी उरले असून, या पाच दिवसांत आपला अर्ज भरला जावा, यासाठी शेतकरी सर्व कामे सोडून दिवस-रात्र अर्ज भरण्याच्या केंद्रावर बसत आहेत. त्यामुळे संगणक परिचालकांनाही अडचणींची शर्यत पार करून कमी दिवसांत जास्त अर्ज भरावे लागणार आहेत.
अमरावती विभागात बुलडाण्याचे सर्वाधिक अर्ज
अमरावती विभागामध्ये आजपर्यंत ११ लाख ३६ हजार ९९४ शेतकर्यांनी अर्ज भरले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३ लाख ४२ हजार ५३४ शेतकर्यांनी अर्ज भरले आहेत, तर अकोला जिल्ह्यात १ लाख ५४ हजार ६४८, वाशिम १ लाख ६१ हजार १३६, अमरावती १ लाख ९७ हजार २३८ व यवतमाळ जिल्ह्यात २ लाख ७९ हजार ४३८ शेतकर्यांनी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरले आहेत.
अशा येताहेत अडचणी
कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज ज्या संकेतस्थळाच्या माध्यमातून भरायचे आहेत, ते संकेतस्थळसुद्धा अनेक वेळा हँग होत असून, लिंक मिळत नाही. अनेक शेतकर्यांकडे आधारकार्ड नाही, तर काही शेतकर्यांच्या आधारकार्डला मोबाइल नंबरची नोंद नसल्याने त्यांना ‘वन टाइम पासवर्ड’ मिळत नाही. अशा शेतकर्यांचे थम्ब इम्प्रेशन घेऊन हा अर्ज भरून ही प्रक्रिया पूर्ण करता येत असली, तरी त्यांचे थम्ब इम्प्रेशन जुळत नाहीत. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर अर्ज भरता आला तर भरलेल्या अर्जाची प्रतच मिळत नाही. सदर अडचणी दूर करण्यासाठी महसूल विभागाकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत.