९0 टक्के विद्यार्थी गणवेशापासून वंचित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 02:54 AM2017-07-25T02:54:59+5:302017-07-25T02:54:59+5:30
बुलडाणा जिल्हा : झीरो बॅलन्स खाते उघडण्यास बँकांची टाळाटाळ
हर्षनंदन वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : शाळा सुरू होऊन एक महिन्याचा कालावधी उलटला तरी नव्वद टक्के गणवेश अनुदान पात्र विद्यार्थी गणवेशापासून वंचीत आहेत. दरम्यान, अनेक बँकांकडून ‘झिरो बॅलेन्स’वर खाते उघडण्यास टाळाटाळ होत असून यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीपर्यंतच्या मोफत गणवेश पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी चारशे रुपये दिले जाणार आहेत़ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. जिल्ह्यात ९२ हजार ४६४ विद्यार्थिनी तर ५४ हजार १३४ विद्यार्थी संख्या आहे़ एकूण १ लाख ४६ हजार ५९८ विद्यार्थ्यांपैकी आजमितीला केवळ १० टक्के विद्यार्थ्यांनीच बँकेत खाते उघडले आहे. या योजनेअंतर्गंत जिल्ह्यातील १३ तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी ५ कोटी ८६ लाख ३९ हजार २०० रुपयाचा निधी लागणार आहे़ २०१७- १८ मध्ये मोफत गणवेश योजनेची तरतूद लाभार्थी विद्यार्थ्यांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़
बॅँकेत विद्यार्थ्यांची खाती उघडण्यासाठी होत असलेली गर्दी आणि काही राष्ट्रीयीकृत बँका झीरो बॅलन्स खाते उघडण्यास करीत असलेली टाळाटाळ यामुळे विद्यार्थी व पालकांची चांगलीच अडचण झाल्याचे चित्र आहे.
बँकेत खाते काढण्याची अडचण काही दिवसांत दूर होईल. तरीही याबाबत काही समस्या असल्यास विद्यार्थ्यास धनादेशाव्दारे गणवेश अनुदान दिले जाईल़
- एन.के.देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुुलडाणा