जिल्ह्यातील ९० शाळा अद्यापही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:32 AM2021-02-07T04:32:18+5:302021-02-07T04:32:18+5:30
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या ५ वी ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात ...
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेल्या ५ वी ते ८ वी च्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील एक हजार ५४४ शाळांपैकी एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. तर, विविध कारणांनी ९० शाळा अजूनही सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे, २३ हजार २५ विद्यार्थी शाळेपासून दूरच आहेत.
गेल्या वर्षी काेराेना संसर्ग वाढल्याने मार्च महिन्यापासून शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली हाेती. सध्या अनलाॅक प्रक्रियेंतर्गंत सुरुवातीला ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यानंतर, २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीच्या शाळा सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील एक हजार ३७५ शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्या आहेत. तसेच ८५ हजार ३९१ विद्यार्थी शाळेत हजर राहत आहेत. मात्र, शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह निघाल्याने, आश्रमशाळा असल्याने तसेच काेविड सेंटर असल्याने जिल्ह्यातील ९० अद्यापही बंच आहेत. ५ फेब्रुवारीपर्यंत जिल्ह्यातील २३ हजार विद्यार्थी शाळेपासून दूरच आहेत.
काेराेनामुळे ऑनलाइन शिक्षण सुरू असले, तरी ग्रामीण भागात माेबाइलचे नेटवर्क राहत नसल्याने शिक्षणात अडथळे येत हाेते. तसेच अनेक पालकांकडे एकच माेबाइल असल्याने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित हाेते. २७ जानेवारीपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
चिखली तालुक्यात सर्वाधिक शाळा बंद
जिल्ह्यात चिखली तालुक्यातील सर्वाधिक १८ शाळा बंद आहेत. तसेच शेगाव तालुक्यातील १७, जळगाव जामाेद तालुक्यातील १, खामगाव तालुक्यातील १२, बुलडाणा तालुक्यातील ७, मलकापूर आणि देऊळगाव राजा तालुक्यातील प्रत्येकी ६ शाळांचा समावेश आहे. माेताळा तालुक्यातील केवळ एक शाळा बंद आहे.
६९ शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह
जिल्ह्यातील सहा हजार ९२९ शिक्षकांची शाळा सुरू हाेण्यापूर्वीच काेराेना चाचणी करण्यात आली हाेती. त्यापैकी ६९ शिक्षक काेराेना पाॅझिटिव्ह आले आहेत. तसेच ५ शिक्षकेतर कर्मचारीही पाॅझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पाॅझिटिव्ह १४ शिक्षक मेहकर तालुक्यात आले आहेत.
ही आहेत शाळा बंदची कारणे
पालकांची संमती नसणे, शिक्षक पाॅझिटिव्ह आले आहेत, काेराेना रुग्ण जास्त असणे. अंध, अपंग निवासी शाळा, खासगी शाळांच्या शाळा समितीचा शाळा सुरू न करण्याचा निर्णय आदी कारणांमुळे शाळा बंद आहेत.