बुलडाणा जिल्ह्यातील ९० टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 10:47 AM2021-07-20T10:47:57+5:302021-07-20T10:48:16+5:30
Corona Vaccination : जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के शिक्षकांचे लसीकरणच पूर्ण झालेले आहे; परंतु विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. १५ जुलैपासून जिल्ह्यातील आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के शिक्षकांचे लसीकरणच पूर्ण झालेले आहे; परंतु विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे.
शाळा सुरू होऊनही काही शिक्षकांनी कोरोना लसीकरण किंवा कोरोना टेस्टिंग केले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे पालकांमध्येसुद्धा मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. शिक्षकांनी शाळेत जाण्यापूर्वी कोरोना लसीकरण किंवा टेस्टिंग करणे गरजेचे आहे. असे शिक्षण विभागाने बजावले होते; परंतु त्याकडे काही शिक्षकांनी दुर्लक्ष केले, तर काही शाळांमध्ये १०० टक्के लसीकरण झाले आहे. लसीकरणाशिवाय अनेक शिक्षकांना मुख्याध्यापकांनी रुजू करून घेतले नाही. त्यामुळे लसीकरण वाढले आहे.
शाळा उघडल्या असून, शिक्षक व विद्यार्थी शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या शिक्षकांनी चाचणी व लसीकरण केले नसेल, त्यांनी प्राधान्याने करून घ्यावे.
-प्रकाश मुकूंद, माध्यमिक शिक्षणाधिकारी,