दिव्यांग काेविड सेंटरमध्ये ९ हजार स्वॅब प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:05 AM2021-03-04T05:05:01+5:302021-03-04T05:05:01+5:30
बुलडाणा तालुक्यातील रायपूर, पाडळी, हतेडी, चांडोळ वरवंड या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस गावातील दुकानदार या ...
बुलडाणा तालुक्यातील रायपूर, पाडळी, हतेडी, चांडोळ वरवंड या प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंगणवाडी सेविका, मदतनीस गावातील दुकानदार या सर्वांचे आरोग्य सेवकांनी कोविंड तपासणीचे स्वॅब गेल्या दहा दिवसापासून बुलडाणा येथील अपंग शाळेतील काेविड सेंटरमध्ये पाठविले आहेत. या सेंटरवर जवळपास ९ हजार स्वॅब पडून असल्याचे चित्र आहे. या सेंटरमधील फ्रीजरमध्ये नवीन स्वॅब ठेवण्यासाठी जागा शिल्लक राहिली नसल्याने काेराेनाची चाचणी लवकर हाेत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे स्वॅब दिल्यानंतर दहा दहा दिवस अहवाल मिळत नसल्याने अनेक पाॅझिटिव्ह रुग्ण गावभर फिरत असल्याने काेराेना रुग्णांची संख्या वाढत आहेत. ग्रामीण भागात आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना तपासणी वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर माेठ्या प्रमाणात स्वॅब घेण्यात येत आहेत. मात्र, स्वॅब ठेवण्याची व्यवस्था अपुरी ठरत असल्याने तसेच प्रयाेग शाळेवर ताण वाढत असल्याने अहवाल येण्यास बराच विलंब हाेत आहे. त्यामुळे, काेराेना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त हाेत आहे .
चाचण्या वाढवल्या सुविधांचे काय
राज्य शासनाने काेराेना चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गंत माेठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहे. मात्र, जिल्हाभरातील विविध काेविड सेंटरमध्ये स्वॅब ठेवण्यासाठी असलेली सुविधा अपुरी पडत आहे. त्यामुळे, अनेकांना दहा दहा दिवस अहवालच मिळत नसल्याचे चित्र आहे. तसेच काहींना तर स्वॅब देऊनही अहवाल मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, काेविड सेंटरमध्ये सुविधा वाढवण्याची गरज आहे.