९० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:05+5:302021-07-01T04:24:05+5:30
बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ ...
बुलडाणा : खरीप हंगामास सुरुवात हाेऊन दीड महिना लाेटला आहे़ तरीही पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याचे चित्र आहे़ निर्धारित लक्ष्यांकाच्या जवळपासही पीक कर्ज वाटप झाले नाही़ २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेटी ५६ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे़ जिल्ह्यातील ९० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाची अजूनही प्रतीक्षा आहे़
काेराेनामुळे गत वर्षीपासून शेतकरी संकटात सापडलेले आहेत़ शेतमाल विकण्याच्या वेळीच निर्बंध लावण्यात येत असल्याने भाव मिळाला नाही़ यावर्षीही तीच परिस्थिती हाेती़ २०२० मध्ये अतिवृष्टीमुळे नगदी पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले हाेते़ हाताताेंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला हाेता़ या नुकसानीतून सावरत शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी केली़ पीक कर्ज मिळेल या आशेने जिल्ह्यातील शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत़;मात्र त्यांना पीक कर्ज मिळत नसल्याचे चित्र आहे़ जिल्ह्यात यावर्षी १ लाख ४० हजार शेतकऱ्यांना १३०० काेटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले हाेते़ त्यापैकी २५ जूनपर्यंत केवळ ४९ हजार ९६४ शेतकऱ्यांना ४४० काेेटी ५६ लाख रुपयांचे कर्जच वितरित करण्यात आले़ केवळ ३६ टक्के शेतकऱ्यांनाच हे कर्ज वाटप करण्यात आले असून ६४ टक्के शेतकरी अजूनही पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत़
राष्ट्रीयीकृत बँकांचा हात आखडता
पीक कर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बँकांनी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे़ बँकांना दिलेल्या उद्दिष्टानुसार पीक कर्जाचे वितरण हाेत नसल्याचे चित्र आहे़ सर्वात कमी पीक कर्ज बँक ऑफ बडाेदाने वितरित केले आहे़ या बँकेने केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले आहे़ तसेच अलाहाबाद बँक १४ टक्के, युकाे आणि कॅनरा बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या १९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ बँक ऑफ इंडियाने ५९ टक्के कर्ज वाटप केले आहे़ आयडीबीआय बँकेने ६६ टक्के कर्ज वाटप केले आहे़
अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
मृग नक्षत्राच्या पावसावर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली हाेती़ त्यानंतर पावसाने दांडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले़ पीक कर्ज मिळेल, या आशेवर अनेकांनी उसनवारी करून पेरणी केली़ त्यातच दुबार पेरणी करावी लागल्याने पुन्हा बियाणे, खते कशी विकत आणावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़