बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये ९,५३७ मालमत्तांचे व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 10:50 AM2021-01-01T10:50:27+5:302021-01-01T10:56:46+5:30

Property transactions in Buldana district : जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत.

9,537 property transactions in Buldana district in December | बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये ९,५३७ मालमत्तांचे व्यवहार

बुलडाणा जिल्ह्यात डिसेंबरमध्ये ९,५३७ मालमत्तांचे व्यवहार

googlenewsNext
ठळक मुद्दे१ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये  ही सूट देण्यात आली होती. ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली.

लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा : मुद्रांक शुल्कामध्ये १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत देण्यात आलेली तीन टक्के सूट पाहता या कालावधीत जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत २२ टक्क्यांनी मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात ९,५३७ व्यवहार झाले.
एकट्या डिसेंबर महिन्याचा विचार करता डिसेंबर २०१९ मधील व्यवहाराच्या तुलनेत दुपटीने मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत वाढ झाली आहे. १ सप्टेंबरपासून मुद्रांक शुल्कामध्ये  ही सूट देण्यात आली होती.  तेव्हापासून ३१ डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची या विविध व्यवहारांपोटी उलाढाल झाली. २०१९ मधील सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांत २६ कोटी ४२ लाख ६१ हजार ३५० रुपयांची उलाढाल झाली होती. पूर्वी मुद्रांक शुल्काचा दर अधिक होता. त्यामुळे व्यवहारांची संख्या कमी होती. मात्र आता मुद्रांक शुल्कामध्ये सूट देण्यात आल्याने  दस्त नोंदणीचे प्रमाण वाढले असून मालमत्ता खरेदी, गहाण खत, बक्षीसपत्र, हस्तांतरण, हक्क सोडपत्र व्यवहारांचा यात समावेश आहे. बक्षीसपत्रांचे प्रमाणही त्यामुळे वाढले असून रक्ताच्या नात्यातील रखडलेल्या व्यवहारांनीही यात वेग घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. सप्टेंबर महिन्यात ४,५९५ व्यवहार झाले तर ऑक्टोबरमध्ये ४,४७८, नोव्हेंबरमध्ये ४,९०१ आणि डिसेंबरमध्ये ९,५३७ व्यवहार झाले. चारही महिन्यांचा विचार करता २३ हजार ५११ मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. 
दरम्यान, ३१ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन चलान भरल्यास ३१ मार्चपर्यंत मुद्रांक शुल्कामध्ये सूट मिळणार आहे. त्याअनुषंगाने रखडलेले व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी दस्त नोंदणीसाठी गर्दी केलेली होती. 


चार महिन्यांत ३२ कोटींची झाली उलाढाल
  जिल्ह्यात चार महिन्यांत ३२ कोटी ३१ लाख ७३ हजार ४४५ रुपयांची मालमत्तांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून उलाढाल झाली. ती महिन्यात सर्वाधिक  १२ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपये एवढी होती.
  नोंदणी फीपोटी ९ कोटी ९४ लाख २८ हजार ७६५ रुपयांचा महसूल शासनास मिळाला आहे. गेल्या वर्षी शेवटच्या चार महिन्यांत पाच कोटी ५७ लाख ५७ हजार ३८५ रुपये नोंदणी फीपोटी मिळाले होते.
  चार महिन्यांत ९० टक्क्यांनी व्यवहार वाढले  आहेत. मुद्रांकापोटी डिसेंबर २०२० मध्ये ८ कोटी ८५ लाख ४५ हजार २३५ रुपयांचा महसूल मिळाला.
 गेल्या वर्षीच्या तुलनेत मुद्रांक शुल्कापोटी सात टक्के अधिकचा महसूल शासनास मिळाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.


कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजना...
कोरोना संसर्गाचा काळ पाहता अनुषंगिक उपाययोजना करण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मास्क लावणे, शारीरिक अंतर पाळण्यावर भर दिला गेला होता.  डिसेंबर महिन्यात दुय्यम निबंधक कार्यालयात वाढलेली गर्दी पाहता अनुषंगिक सूचना दिल्या गेल्या होत्या.


कामे गतिमान करण्यास प्राधान्य देण्यात येत असून आता इंटरनेट सुविधेचाही वेग वाढविण्यासाठी खासगी जोडणीचा आधार घेऊन कामाचा वेग वाढविण्यास प्राधान्य राहणार आहे. शासनाने दिलेल्या या सवलतीमुळे जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार जवळपास दुपटीने वाढल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठीही आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.         
- नितीन शिंदे, जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी

Web Title: 9,537 property transactions in Buldana district in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.