९ हजार ६०० विद्यार्थी देणार एमपीएससीची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:27+5:302021-09-04T04:41:27+5:30
बुलडाणा : महाराष्ट लाेकसेवा आयाेगाच्या वतीने घेण्यात येणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ४ सप्टेंबर राेजी ...
बुलडाणा : महाराष्ट लाेकसेवा आयाेगाच्या वतीने घेण्यात येणारी दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जिल्ह्यातील ३० केंद्रांवर ४ सप्टेंबर राेजी पार पडणार आहे़. या परीक्षेसाठी ८३४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़. जिल्ह्यातील ९ हजार ६०० विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.
काेराेनामुळे संयुक्त पूर्व परीक्षा दाेनवेळा पुढे ढकलण्यात आली हाेती़. आता आयाेगाने ही परीक्षा ४ सप्टेंबर राेजी हाेणार असल्याचे जाहीर केले हाेते, तसेच १० दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. काेराेनाविषयक नियमांचे पालन करून या परीक्षा पार पडणार आहेत. काेराेनामुळे गावी परतलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी परीक्षा देता यावी, यासाठी केंद्र बदलण्याची सुविधा एमपीएससीच्या वतीने देण्यात आली हाेती़. त्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र बदलले हाेते़. यावेळी विद्यार्थी वाढल्याने बुलडाणा शहरासह चिखली आणि खामगावातही परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.
सकाळी ११ ते १२ या वेळेत परीक्षा पार पडेल. परीक्षा केंद्रामध्ये परीक्षार्थ्यांना सकाळी १०.३० नंतर प्रवेश मिळणार नाही. त्यासोबतच एमपीएससीने यापूर्वी ११ एप्रिल रोजी जारी केलेले प्रवेश पत्र ग्राह्य धरण्यात येणार नसून, परीक्षार्थ्यांना नव्याने जारी परीक्षा पत्र घेऊनच परीक्षेला उपस्थित राहावे लागेल.
परीक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना
अशी घेण्यात येणार दक्षता परीक्षा
केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्रितरीत्या प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्यांचे इफ्रारेड थर्मामीटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजन टेस्ट करणे अनिवार्य राहील, हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावरील सर्व खिडक्या, तसेच दरवाजे उघडे ठेवावे लागणार आहेत. सर्व अधिकारी, कर्मचारी, तसेच परीक्षार्थी यांना मास्कचा वापर करणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक परीक्षार्थीमध्ये किमान तीन फुटाचे अंतर राहणार आहे.
एकूण विद्यार्थी ९६००
परीक्षा केंद्र ३०
पर्यवेक्षक १४९
समवेशक ४६८
शिपाई ३१
एकूण कर्मचारी ८३४