९९ कोटींच्या घाेटाळ्याची समितीकडून होणार चौकशी
By संदीप वानखेडे | Published: March 31, 2023 06:11 PM2023-03-31T18:11:55+5:302023-03-31T18:12:17+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयातील साहित्य घाेटाळा
संदीप वानखडे, बुलढाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयातील ९९ कोटींच्या साहित्य खरेदी घोटाळ्याचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. या घोटाळ्याची चौकशी आरोग्य उपसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती चाकशी करणार असल्याची माहिती आहे. ही समिती पुढील आठवड्यात गठित करण्यात येणार असून समितीकडून बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन साहित्याची पाहणी करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयात झालेल्या साहित्य साहित्य खरेदीत ९९ काेटी रुपयांचा घाेटाळा झाल्याचा आराेप आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत केला होता. जिल्हा सामान्य रुग्णालयाला आवश्यक साहित्य आणि औषधी खरेदी करण्यासाठी ९९ काेटी रुपयांचा निधी मिळाला हाेता. या निधीतून ५० ते ८० बेड, ईसीजी मशीन, व्हेंटिलेटर, सिरीज, डायग्नोसेशन मशीन, प्रिंटर, कॉम्प्युटर, एसी स्ट्रेचर, बेड टीव्ही कूलर अशा अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्यात आल्याचे दाखवण्यात आल्याचा आराेपही आमदार गायकवाड यांनी केला हाेता. हे साहित्यच अस्तित्वात नसून डायलिसिस मशीनही रुग्णालयात उपलब्ध नसल्याचे त्यांनी म्हटले हाेते.
फायर प्रतिबंधक साहित्य ज्या कंपनीने बसवले ती कंपनी मुळात त्या अटी आणि शर्तींमध्ये बसत नसूनही त्या कंपनीला कंत्राट देण्यात आला. ज्या कंत्राटदाराला सिव्हिल सर्जनने ब्लॅक लिस्टचे पत्र दिले त्याला परत हे ९९ कोटी रुपयांसह पुन्हा २३ कोटी रुपयांचा कंत्राट देण्यात आल्याचा आराेप आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत केला हाेता.