खासगी बसमधून ६० लाखांची बॅग लंपास; राष्ट्रीय महामार्गावरील वडनेरनजीकची घटना
By सदानंद सिरसाट | Published: February 10, 2024 07:06 PM2024-02-10T19:06:40+5:302024-02-10T19:06:44+5:30
नांदुरा पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.
नांदुरा (बुलढाणा) : कुरिअर सर्व्हिसच्या माध्यमातून खासगी प्रवासी बसमधून पैसे घेऊन जात असताना चहा पाण्यासाठी थांबलेल्या ठिकाणी ६० लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ९ फेब्रुवारी रोजी रात्री ९:३० वाजता दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वडनेर (भोलजी) नजीकच्या हॉटेल विश्वगंगासमोर घडली.
कुरिअर सर्व्हिसचे काम करणारे प्रमोद मोहनसिंह परमार (३०), रा. उत्तरी मेघवाल, हनुमान मंदिराजवळ, नेहवास, ता. जि. सिरोही, (राजस्थान) हल्ली मुक्काम लक्ष्मी विहार अपार्टमेंट, अकोला यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये रमेश कुमार अंबालाल कंपनी मुंबई यांच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असलेल्या शाखेपैकी अकोला येथील शाखेमध्ये शाखा मॅनेजर विक्रमसिंग स्वरुपसिंग मांगलियार यांच्या हाताखाली कुरिअर सर्व्हिसचे काम करतात. कंपनीची रोख रक्कम घेऊन जाण्याचे काम असून दर पाच ते सहा दिवसांनी वेगवेगळ्या जिल्ह्यात कॅश घेऊन जात असतो, ९ फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे अकोलावरून जीपीएस मशीन लावलेल्या काळ्या रंगाच्या बॅगेत ६० लाख रुपये ठेवून आर संगीतम ट्रॅव्हल्सने निघाले. रात्री ९:३० वाजेदरम्यान वडनेर (भोलजी ) नजिकच्या हॉटेल विश्वगंगा येथे रोख रक्कमेची बॅग सीटवर शाल खाली ठेवून गाडीच्या खाली उतरले.
तसेच चहा बिस्किट घेऊन खात बसले असता त्यादरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने गाडीतील ६० लाख रुपये उडवून हॉटेलपासून एक किलोमीटर अंतरावर बॅगेतील रोख रक्कम काढून जीपीएस मशीनसह बॅग फेकून देत पोबारा केल्याचे म्हटले, माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नाकाबंदी केली. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. नांदुरा पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले. याप्रकरणी नांदुरा पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नागेश जायले करीत आहेत.