राज्यभरातील तलाठ्यांच्या बदली प्रक्रियेला ब्रेक; अप्पर मुख्य सचिवांचे विभागीय आयुक्तांना आदेश
By संदीप वानखेडे | Published: May 6, 2023 03:46 PM2023-05-06T15:46:34+5:302023-05-06T15:46:46+5:30
बदली प्रक्रिया रखडण्याची शक्यता
बुलढाणा : सध्या विविध शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची लगबग सुरू आहे़ शासनाच्या महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठ्यांच्या बदली प्रक्रियेला ती सुरू हाेण्यापूर्वीच ब्रेक लागल्याचे चित्र आहे़ या बदल्यांना सध्या स्थगिती देण्याचे आदेश महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांनी विभागीय आयुक्तांना आदेश दिले आहेत़ त्यामुळे, या बदल्या आता रखडण्याची शक्यता आहे़
महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठ्यांची बदली प्रक्रिया एप्रिल ते मेच्या दरम्यान दरवर्षी पार पडते़ या वर्षीही उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावर बदली प्रक्रिया सुरू करण्याची तयारी केली होती़ मात्र, महसूलच्या अप्पर मुख्य सचिवांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना ताेंडी आदेश देत बदली प्रक्रिया तूर्तास करू नये असे बजावले आहे़ त्यामुळे, यंदा बदल्या हाेणार किंवा नाही याविषयी तलाठ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे़ शासनाने धाेरणात्मक निर्णय घेऊन बदली प्रक्रिया सुरू करण्याची मागणी तलाठ्यांकडून हाेत आहे.
अशी असते बदलीची प्रक्रिया
बदलीसाठी अर्ज आल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या वतीने बदलीसाठी पात्र तलाठ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात येते़ तसेच रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात येते़ बदलीपात्र तलाठ्यांकडून गावांचे प्राधान्यक्रम घेण्यात येतात़ त्यानंतर नागरी सेवेची बैठक घेऊन बदलीसाठी पात्र तलाठ्यांची शिफारस करण्यात येते.
३१ मेपर्यंत बदल्यांची मुदत
बदली अधिनियमानुसार ३१ मेपर्यंत तलाठ्यांची बदली करता येते़ मे महिन्याचा पहिला आठवडा उलटूनही प्रक्रिया सुरू करण्यात आली नाही़ प्रक्रियेला बराच वेळ लागणार असल्याचे ३१ मेपर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान प्रशासनासमाेर राहणार आहे़ दरम्यान, राज्यभरात काही ठिकाणी बदलीची प्रक्रिया सुरू झाली हाेती; तर काही ठिकाणी सुरू हाेणार हाेती़ मात्र, नवीन आदेशामुळे ही बदली प्रक्रिया रखडली आहे़