अटक टाळण्यासाठी मागितली दहा हजारांची लाच; किनगाव राजा पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा
By संदीप वानखेडे | Published: September 2, 2023 05:46 PM2023-09-02T17:46:09+5:302023-09-02T17:46:21+5:30
अटक करून जेलमध्ये न टाकण्यासाठी किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या हेडकॉन्स्टेबलने १० हजारांची लाच मागितली.
बुलढाणा : अटक करून जेलमध्ये न टाकण्यासाठी किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या हेडकॉन्स्टेबलने १० हजारांची लाच मागितली. याप्रकरणी लाचखोर हेडकॉन्स्टेबलविरुद्ध १ सप्टेंबर राजी किनगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनगाव राजा पोलीस स्टेशनअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करून जेलमध्ये न टाकण्यासाठी एकास हेडकॉन्स्टेबल अरुण गणपतराव मोहिते यांनी २० हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती १० हजार रुपये घेण्याचे ठरले. परंतु तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाच मागणी पडताळणीमध्ये हेडकॉन्स्टेबल अरुण मोहिते यांनी लाच स्वीकारण्यास संमती दर्शविल्याचे समोर आले. त्यामुळे मोहितेविरुद्ध किनगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे, पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, राजेश क्षीरसागर, प्रवीण बैरागी, विनोद लोखंडे, जगदीश पवार, शैलेश सोनवणे, महिला पोलिस कॉन्स्टेबल स्वाती वाणी, चालक पोलिस कॉन्स्टेबल नितीन शेटे, अरशद शेख यांनी केली.