राष्ट्रीय महामार्गावर धावती बस उलटली; १६ प्रवासी जखमी, तिघांना बुलढाणा येथे हलविले

By सदानंद सिरसाट | Published: July 29, 2024 03:07 PM2024-07-29T15:07:27+5:302024-07-29T15:08:05+5:30

उलटलेल्या बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जीवितहानी टळली मात्र चालकासह १६ प्रवासी जखमी झाले.

A bus overturned on the national highway; 16 passengers injured, three shifted to Buldhana | राष्ट्रीय महामार्गावर धावती बस उलटली; १६ प्रवासी जखमी, तिघांना बुलढाणा येथे हलविले

राष्ट्रीय महामार्गावर धावती बस उलटली; १६ प्रवासी जखमी, तिघांना बुलढाणा येथे हलविले

मलकापूर (बुलढाणा) : भररस्त्यावर धावती बस रस्त्याच्या मधोमध उलटली. खिडकीच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर तांदुळवाडी वळणानजीक फौजी धाब्यासमोर सोमवारी सकाळी ९:१५ वाजता हा अपघात घडला. त्यामध्ये १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांना बुलढाणा येथे हलविण्यात आले.

खामगाव आगाराची शेगाव-शिर्डी बस क्रमांक एमएच-४०, वाय-५५७६ आज सोमवारी सकाळी ८:४० वाजता मलकापूर आगारातून एकूण ३५ प्रवासी घेऊन निघाली होती. धरणगाव येथून सुरळीत धावत असताना पुढे थोड्याच अंतरावर ९:१५ वाजता तांदुळवाडी वळणानजीक फौजी धाब्यासमोर अचानक ही बस थांबली. पाहता पाहता महामार्गावरील दुभाजकावर उलटली. हा अपघात अचानक घडल्याने बसमधील प्रवाशांना जबर धक्का बसला. तर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली. घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. उलटलेल्या बसच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जीवितहानी टळली मात्र चालकासह १६ प्रवासी जखमी झाले.

बसमधील शरद बारसू झोपे (४२) तळणी, गोविंद भास्कर नारखेडे (५७) बोराखेडी, वर्षा माधव भारंबे (३५) नरवेल, माधव नारायण भारंबे (४४) नरवेल, मंदा पंजाबराव देशमुख (६३), वैष्णवी पंजाबराव देशमुख (२३) वसाडी नांदुरा, रचना प्रभाकर वले (३८) कुर्हा, शोभा परमेश्वर पांडे (४०) पैसोडा, गणेश ज्ञानदेव चेंडाळणे (३९) मानकी व चालक खुशाल हनुमंतराव देशमुख (३५) यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी गोविंद भास्कर नारखेडे, माधव नारायण भारंबे व मंदा पंजाबराव देशमुख यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांना बुलढाणा येथे हलविण्यात आले. याखेरीज उर्वरित जखमी प्रवाशांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता, महामार्गावर तांदुळवाडी वळणानजीक फौजी धाब्यासमोर बस धावत असताना अचानक प्रवासी वाहतूक करणारी ऑटोरिक्षा रस्त्याच्या मधोमध पुढे आली. तिला वाचवण्यासाठी बस चालकाने तातडीने ब्रेक लावला. तो इतका जोमाने लागला की धावती बस अचानक रस्त्यावर थांबली. अन् पाहता पाहता सिनेस्टाईल घटनेप्रमाणे दुभाजकावर उलटली. मात्र, महामार्गावर अन् भररस्त्यावर दुभाजकावर बस उलटल्यानंतर प्रवासी बालंबाल बचावले. घटनेची माहिती कळताच महामार्ग पोलिस, एमआयडीसी पोलिस व राज्य परिवहन महामंडळाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी काही काळ ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. तर महामंडळाच्या पथकाने जखमींची अपडेट घेत प्रवाशांना धीर दिला. या घटनेत जखमींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जोऱ्यान पयाली अन् कशी पलटी झाली बाप्पा...!
धरणगावावरून निघाली तोवर ठीक होतं पण जरा पुढे गेली जोऱ्यान पयाली अन् कशी काय पलटी झाली बाप्पा देवालेच माहीत. आम्हाले कायं घडलं कस घडलं कायी समजलंच नाही. कसे बसे खिडकीच्या काचा फोडून बाहेर पडलो. जीव वाचला बाप्पा तेवढंच .. अशी प्रतिक्रिया जखमी प्रवासी गोविंद भास्कर नारखेडे यांनी दिली.

Web Title: A bus overturned on the national highway; 16 passengers injured, three shifted to Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात